हडपसर – साडेसतरानळी परिसरातील मार्व्हल बाऊंटी सोसायटीमध्ये एका महिलेने आपल्या सदनिकेत सुमारे तीनशे मांजरे पाळली होती. या मांजरांचे ओरडणे तसेच, लघवी व विष्ठेच्या दुर्गंधीने येथील रहिवासी हैराण झाले होते. दरम्यान, काल (ता. १६) पालिकेने संबंधित महिलेला नोटीस बजावल्यानंतर आज तेथून या मांजरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे गेली काही वर्षांपासून त्रस्त असलेल्या येथील रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या कारवाईमुळे रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

मार्व्हल बाऊंटी सोसायटीतील नवव्या मजल्यावरील एका सदनिकेत रिंकू व त्यांची बहीण रितू भारद्वाज यांनी मांजरे पाळली होती. त्यासाठी त्यांनी दहा कामगारांची नेमणूक केली होती. ते कामगार सोसायटीच्या लिफ्ट मधून विष्ठा नेत असल्याने रहिवाशांना गेली पाच वर्षांपासून त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

अधिक वाचा  पुणे महापालिकेसाठी चार-सदस्यीय प्रभाग रचना निश्चित; स्थानिक निवडणुकांची तयारी गतीमान

याबाबत सोसायटीने पालिका व पोलिसांकडे अनेकदा तक्रारही केली होती. मात्र, पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तब्बल पाच वर्षांनंतर काल सदनिकेची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना सुमारे तीनशेच्यावर मांजरे आढळून आली. सदनिका उघडताच उग्र दुर्गंधीने तेही हैराण झाले. अधिकाऱ्यांनी संबंधीत महिलेला नोटीस देऊन मांजरे येथून हलविण्यास सांगितले.

दरम्यान, आज दुपारपर्यंत सुमारे सत्तर मांजरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राहिलेली मांजरेही तातडीने स्थलांतरित करावीत, अशी सूचनाही संबधीत महिलेला केली असल्याचे पालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पुंडे यांनी सांगितले.

‘आमची १४० सदनिका असलेली मोठी सोसायटी आहे. त्यातील नवव्या मजल्यावर साडेतीनशे बीएचकेच्या सदनिकेत भारद्वाज भगिनींनी मांजरे पाळली आहेत. त्यांची संख्या पन्नास-साठ असावी, असे वाटले होते. त्याबाबत पालिकेकडे तक्रारही केली होती. मात्र, काल झालेल्या पाहणीत ही संख्या तीनशेच्यावर असल्याचे समजले. सोसायटीतील नागरिकांना गेली पाच-सहा वर्षांपासून मांजरांचे ओरडणे व दुर्गंधी सहन करावी लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी सोसायटीचा हा प्रश्न आता तडीस न्यावा.’

अधिक वाचा  मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये विमान क्रॅश; नागरी वस्तीत प्रवासी विमान कोसळलं

– कल्पेश दवे, चेअरमन, मार्व्हल बाऊंटी सोसायटी

‘जास्त प्राण्यांमुळे परिसरात आमोनिया वायूचे प्रमाण वाढते. आम्ही कारवाईसाठी गेलो तेंव्हा सोसायटीत उग्र दुर्गंधी येत होती. सदनिका उघडताच ही दुर्गंधी आणखी उग्र झाली. त्यामुळे आम्ही हैराण झालो. सर्व घरात तीनशेच्यावर मांजरे आढळली. त्यांची विष्ठा व मूत्रही दिसून आले. लहान मुले व ज्येष्ठांना श्वसनाचा आजार होण्याचा धोका आहे. ही सर्व बाब व नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.’

– डॉ. ललिता गावडे – खुटाळे, पशुधनविकास अधिकारी, महापालिका, पुणे.