वादाने गाजलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाड याला उपविजेते पदासाठी असलेले बक्षीसच मिळालं नसल्याचं समोर आहे. या गोष्टीचं राजकारण सुरू असल्यानेच आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचा आरोप महेंद्र गायकवाड याने केला.
यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चांगलीच गाजली. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झालेल्या अंतिम लढाईत पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं. तर पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन मैदान सोडून गेलेला महेंद्र गायकवाड हा उपविजेता ठरला.
बोलेरो गाडीचं बक्षीस
स्पर्धेतील उपविजेत्याला बोलेरो गाडी हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं. पण महेंद्र गायकवाडला हे बक्षीस अद्याप मिळालंच नसल्याचं समोर आलं. या स्पर्धेमध्ये झालेल्या राजकारणामुळे आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचं महेंद्र गायकवाड याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने एकत्र येऊन काम करावे. जेणेकरून पैलवानांचं नुकसान होणार नाही असं आवाहन महेंद्र गायकवाड याने केलं.
एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, चंद्रहार पाटील उपोषण करणार
राज्यात चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात येतात हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अपमान असून राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने केली. या मागणीसाठी मंगळवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पैलवान चंद्रहार पाटील लाक्षणिक उपोषण करणार आहे. वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रात देखील कुस्ती संघटनेचीही एकच संघटना असली पाहिजे, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील याने स्पष्ट केलं आहे.
आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून याविरोधात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे