जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपची साथ देणार गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जयंत पाटलांच्या संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या चर्चांना आता अधिक बळ मिळताना दिसत आहे. जयंत पाटील यांनी त्यावर काही स्पष्ट भाष्य जरी केलं नसलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र भूमिका स्पष्ट केली आहे. जयंट पाटील कोणत्याही पक्षात जावोत, आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहू अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसतंय.
काय म्हणाले कार्यकर्ते?
जयंत पाटलांच्या राजकीय भूमिकेवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं एका कार्यकर्त्याने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी जनसमान्यांत रुजवायला जयंत पाटलांनी काम केलं. पण ज्यांची पात्रता नाही असे लोकही आज जयंत पाटील यांच्यावर बोलायला लागले आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जयंत पाटील कोणत्याही पक्षात राहोत, त्यांच्यामागे आम्ही असू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसतंय.
चंद्रकांत पाटलांनी हात जोडले
जयंत पाटील हे सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसून येतंय. या सगळ्यावर राज्याचे मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी हात जोडल्याचं दिसून आलं.
जयंत पाटील कुठे गायब?
बीडमधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा पुरस्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा महायुती सरकारमधील धुसफूस असो. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत कुठे ? असा प्रश्न स्वतः त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवल वाटायला नको.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांत दुर्मिळ झाल्याचं दिसून येतंय. योगायोग म्हणा किंवा आणखी काही. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असताना, जयंत पाटलांनी इस्लामपूरमधील इंजीनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरींना आमंत्रित केलं. जयंत पाटलांच्या राजाराम बापू इंजिनीअरिंग कॉलेजच्या नवीन वसतीगृहाचं आणि जिम्नॅशियमचं उद्घाटन गडकरींच्या हस्ते होत आहे. जयंत पाटील भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा अनेकदा डोकं वर काढतात. आता देखील त्या चर्चांचा पुनर्जन्म होणार का हे पाहावं लागेल.