राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांना मिळणारे धक्का थांबत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक जण शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाची पुन्हा उभारणी सुरु केली. परंतु शरद पवार यांच्या पक्षाला बसणारे धक्के कमी होत नाही. आता शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार भाजपमध्ये दाखल होणार आहे. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव येथील कार्यक्रमात माजी आमदार दिलीप वाघ यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षांपासून संबंध
माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांचे परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत राजकीय संबंध आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते पक्षावर नाराज आहेत. यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिली.
मुंबईत होणार प्रवेश सोहळा
येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीप वाघ यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशाने पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपची ताकद वाढणार आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू संजय वाघ देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.