महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झालीय. मात्र, अजूनही एक आरोपी फरार आहे. चौकशीसाठी SIT स्थापन केली. मात्र, अजूनही देशमुख कुटुंबियांच्या मनासारखा तपास होत नाहीय. आता मस्साजोगच्या ग्रामस्थांची या संबंधी बैठक होणार आहे. कृष्णा आंधळे सारखा गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही हा मुद्दा बैठकीत असणार आहे. विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी आम्ही वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेत. आजपर्यंत सरकारी वकिलाची का नियुक्ती केली नाही? आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी का केले नाही? या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
“बावनकुळे साहेबांनी सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली, 25 दिवसानंतर हा विषय कसा वर येतो?. बावनकुळे साहेबांना याच्यात काहीतरी राजकारण करायचं आहे. सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. हे प्रकरण भरकटण्याचा प्रयत्न बावनकुळे करत आहेत” असं मस्साजोगच्या ग्रामस्थांच म्हणणं आहे. “लोकसभेच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा प्रखरतेने मांडावा, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विशेष लक्ष द्यावं” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे.
‘मनोज दादा चीडण सहाजिक’
“धस अण्णांवर विश्वास आहे. मनोज दादा पाटील आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एखादा माणूस या प्रकरणात पूर्णपणे स्टँड घेतो आणि अचानक भेटतो तेव्हा मनोज दादा चीडण सहाजिक आहे. बावनकुळे साहेब तुम्ही भेट घालून आणली तर त्या दिवशी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही गैरसमज का पसरवत आहात?” असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
‘बावनकुळे साहेब एक दिवस गावाच्या इथली परिस्थिती पहा’
“बावनकुळे साहेब एक दिवस गावाच्या इथली परिस्थिती पहा. संतोष देशमुख हे भाजपाचे बूथ प्रमुख होते. त्यांनी निस्वार्थपणे भाजपाचे काम केलं. शरद पवार यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी इथे येऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्या. बावनकुळे साहेब भाजपाचे मोठे नेते आहेत, त्यांनी इथे यायला पाहिजे होतं. लोकांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे होत्या” असं ग्रामस्थ म्हणाले. “त्यांनी तसं न करता धनंजय मुंडे व सुरेश धस यांची भेट घडवून आणली या प्रकरणाला डिव्हाईड करण्याचा प्रयत्न बावनकुळे साहेबांनी केला” असं ग्रामस्थांच म्हणणं आहे.