बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मागील काही काळापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला पोलिसांकडून शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिवाय, एकही आरोपी सुटला तर टोकाचं पाऊल उचलू अशी थेट भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. यामुळे आता बीडचं राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे.
अशात आता मस्साजोगमध्ये आज दुपारी ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा. यासाठी आता मासाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीयांना आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने त्यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जातोय.
या सर्व घटना घडामोडीनंतर आता संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरीच आंदोलन हातात घेऊ शकतात, अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. असं झालं तर बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये मस्साजोगचे गावकरी काय निर्णय घेणार? देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी लढा आणखी तीव्र होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
बीड जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू
खरं तर, बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते. त्या अनुषंगाने व बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणाने बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा चालू आहे तर दहावीची परिक्षा २१ फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्या अनुषंगाने हे जमाबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश लागू करण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी ते 01 मार्च पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. त्यामुळे 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही असं आदेशात नमूद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बीड, यांच्या अहवालावरून बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही लाठी,काठी, बंदूक, तलवार, कोणतेही ज्वलनशील पदार्थ जवळ बाळगणार नाहीत असे झाल्यास आपल्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.