आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद आणि प्रदर्शन (ITCX) २०२५ आजपासून आंध्रप्रदेशातील तिरुपतीमध्ये सुरु झाले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंदिरे ही ज्ञानाची केंद्रे व्हावीत असा आमचा प्रयत्न आहे. यावेळी त्यांची राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासमवेत भेट झाली.
देशभरातील मंदिरांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरे ही ज्ञानाची केंद्रे व्हावीत हा प्रयत्न या टेम्पल कन्वेंक्शनच्या माध्यमातून केला जात आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान बालाजीचे दर्शन घेण्याची माझी आज इच्छा पूर्ण झाली, त्यांनी निवडणुकीत जो आशिर्वाद दिला आणि आम्हाला यश मिळाले आहे.
या आंतराष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत.यासोबतच अयोध्येचे स्वामी आनंदगिरी महाराज, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी देखील या अधिवेशनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह आहे.
जगातील १,८८७ मंदिरे सहभागी
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली हे दुसरे आंतरराष्ट्रीय टेम्पल कनव्हेंशन आंध्र प्रदेशात होत आहे, ज्यामध्ये जगभरातील १,८८७ मंदिरे सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापन, अर्थव्यवस्था, सामाजिक कार्य आणि गर्दी नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. आयटीसीएक्स २०२५ हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन संस्थांना एकत्र करेल. या जागतिक कार्यक्रमात मंदिर व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये शाश्वत परिसंस्था, डिजिटलायझेशन आणि मंदिर-आधारित अर्थव्यवस्था वाढविण्यासाठीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
मंदिराच्या व्यवस्थापनावर चर्चा
या कन्वेक्शनमध्ये निधी व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणापासून ते स्थिरता आणि सुरक्षा प्रोटोकॉलपर्यंत मंदिराच्या विविध कामकाजावर चर्चा केली जाईल. हा कार्यक्रम एआय, डिजिटल टूल्स आणि फिनटेक सोल्यूशन्सद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करेल. लंगर आणि अन्न वितरण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि कायदेशीर पालन या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल. वैद्यकीय सहाय्य, शैक्षणिक कार्यक्रम आणि धर्मादाय उपक्रम यासारख्या आवश्यक सामुदायिक सेवांवरही चर्चा होईल. या सर्वांचा उद्देश अधिक कार्यक्षम आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी मंदिर परिसंस्था निर्माण करणे आहे.