आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेंच्या सेनेने पुण्यामध्ये लॉन्च केलेले मिशन पुण्याची चर्चा आहे. मिशन पुण्याच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करीत आहे.आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता असतानाच ठाकरे सेनेने देखील मिशन पुणे लॉन्च केले आहे. त्याची जबाबदारी ठाकरे सेनेने वसंत मोरे यांना दिली आहे. ‘कोणतेही युद्ध जिंकायचे असेल तर प्रथम त्याचे नियोजन करावे लागते,’ असे वसंत मोरे म्हणाले.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेने तयारीला सुरुवात केली आहे. महापालिकेचे निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केली आहे.

अधिक वाचा  कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये

यानंतर वसंत मोरे हे ठाकरे सेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहे. महापालिका निवडणुका कधी होतील हे निश्चित नसताना देखील आत्तापासूनच ठाकरे सेनेने पालिका इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून महापालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.

मिशन पुणे महानगरपालिका अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तसेच खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहीर तसेच पुणे शहर सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे तसेच शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या नियोजन सहकार्यात सोमवारपासून पुणे मनपा निवडणूक इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडूनही जाहीर कार्यक्रमात थेट ‘मनसे’ संकेत!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय (पुलाची वाडी, पुणे) येथे या मुलाखती होणार आहेत.

सोमवार 17 फेब्रुवारी

दु .3 वा. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा,

दु. 4 वा. हडपसर विधानसभा ,

सायं. 5 वा. कोथरूड विधानसभा,

सायं. 6 वा. पुणेकॅन्टोन्मेंट विधानसभा

मंगळवार 18 फेब्रुवारी

 दु. 3 वा. पर्वती विधानसभा

 दु. 4 वा. कसबा विधानसभा

सायं. 5 वा. वडगाव शेरी विधानसभा

सायं. 6 वा. खडकवासला विधानसभा

असा मुलाखतीचा कार्यक्रम असेल.