राज्यात सगळीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मिशन टायगर जोरात सुरू असले तरी पुणे शहरात मात्र त्याला ब्रेक लागला आहे. काही माजी आमदारांना थेट शिंदेंकडून विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा असल्याची चर्चा आहे.तो मिळत नसल्यानेच सगळे प्रवेश लांबणीवर पडले असल्याचे दिसते आहे. यासाठीच होणाऱ्या भेटीगाठीही थंडावल्या आहेत.
दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून अलीकडेच ५ माजी नगरसेवक बाहेर पडले, मात्र त्यांनी शिंदेसेनेचा दरवाजा वाजवण्याऐवजी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे पसंत केले. प्रादेशिकपेक्षा राष्ट्रीय पक्ष चांगला असे त्यांचे त्यावेळचे वक्तव्य होते व त्याचबरोबर खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असेही त्यांनी शिंदेसेनेला डिवचले होते. त्यावरून बराच गदारोळ झाल्यावर मात्र त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व शिंदेसेनेबरोबर मनोमीलन असल्याचे जाहीर केले. मात्र ते शिंदेसेनेत आले नाहीत व भाजपमध्ये गेले हे वास्तव कायम राहिले. उद्धव सेनेच्या राहिलेल्या नगरसेवकांपैकीही काहीजण भाजपतच जाणार असल्याची चर्चा आहे.
त्यानंतर शिंदेसेनेतील पुण्यातील प्रवेश जवळपास थांबल्यातच जमा आहेत. माजी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचीही नावे ते शिंदेसेनेत जाणार म्हणून घेतली जात होती. मात्र यातील धंगेकर यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांकडे यात काहीही तथ्य नाही असे स्पष्ट केले, तर मोकाटे व बाबर यांनी यावर काहीच जाहीर भाष्य केलेले नाही, त्याचबरोबर त्यांनी शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांबरोबर होणाऱ्या भेटीही थांबवल्या आहेत. महादेव बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत उघडपणे पक्षाच्या ( उद्धव सेना) उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. ज्या आमदारांना प्रवेश करायचा आहे, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विधानपरिषदेचा शब्द मागितला असल्याचे समजते.
भाजपत प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढत चालली आहे व शिंदेसेनेकडे मात्र कोणीही नाही यावरूनच त्यांचे मिशन पुणे थंड झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक पक्ष सोडणार अशी मध्यंतरी चर्चा होती, मात्र तेही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. तिथूनही शिंदेसेनेत यायला कोणीच इच्छुक नसल्याचे दिसते आहे. राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये शिंदेसेनेला दुय्यम महत्व दिले जात असल्याचा हा परिणाम असल्याचे मत स्थानिक राजकारणातील काही ज्येष्ठांनी व्यक्त केले.
मिशन पुणे यशस्वी होणारच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आता लोकनाथ अशी झाली आहे. प्रवेश होणार आहेत, त्यात उद्धवसेनेबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी आमदारांच्या प्रवेशाची चर्चा वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात शिंदे यांच्या हस्ते काही कार्यक्रम होणार असल्याने त्यानंतर म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात पुण्यात निश्चितपणे प्रवेश होतील. – शहरप्रमुख शिवसेना (एकनाथ शिंदे)