महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली नाही. पालकमंत्री पदाच्या वादानंतरही एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे. याचा प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्ताने आला आहे. राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून आढावा घेतला जातो. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचे मानले जात आहे.

अधिक वाचा  समुद्रात रायगडच्या कोरलई इथं संशयास्पद पाकिस्तानी बोट?; बोटीतून व्यक्ती उतरल्याचा संशय ‘कोम्बिंग’ सुरू 

एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

एकनाथ शिंदेंच्या को-ऑर्डिनेशन रुममधून काय काम होणार?

अधिक वाचा  राज्यात मेगाभरती! मंत्रालयात राखीव ५० जागा बिगर आदिवासींनी बळकावल्या भरती प्रक्रियेचे नियम बदलणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुममधून आढावा घेतला जाईल. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना वॉर रुमच्या बैठकांप्रमाणे को- ऑर्डिनेशन रुमच्या बैठकांनाही हजर राहावे लागेल. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची ओढाताण होऊ शकते. त्यामुळे एक समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते. परिणामी ही को ऑर्डिनेशन रुम एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, आता मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे हा कक्षही एकनाथ शिंदे यांच्या हातातून गेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  विकएन्डला शूटिंग “आनंद देवदेशमुख” कान्स पर्यंत मजल मारणारा हरहुन्नरी दिग्दर्शक अवलिया