लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट अखेर आज (14 फेब्रुवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. आता थिएटरमध्ये ‘छावा’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विकी कौशलच्या करिअरमधील सर्वांत जबरदस्त परफॉर्मन्स.. अशा शब्दांत प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. गेल्या काही दिवसांत ‘छावा’ची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा कमालीची झाली होती. त्यामुळे हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम रचण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेल्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते जाणून घेऊयात..
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘छावा’ला पाचपैकी साडेचार स्टार्स रेटिंग दिली आहे. ‘इतिहास, भावना, देशभक्ती या सर्वांचं उत्कृष्ट मिश्रण. विकी कौशलची जबरदस्त कामगिरी. आताच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्याने आपलं स्थान निश्चित केलंय. तर कथाकार म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरही यशस्वी ठरले आहेत,’ असं त्यांनी लिहिलंय.
‘दहा ऑस्कर पुरस्कार वितळवून त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवा आणि त्या मूर्तीने अभिनेता विकी कौशलचा सन्मान करा’, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘छावामध्ये विकी कौशल चमकतो. इतर कलाकार ठीक आहेत. चित्रपट मोठा वाटतो आणि पार्श्वसंगीत त्या काळातील वाटत नाही, पण सर्वकाही योग्य आहे. शेवटची वीस मिनिटं तुम्हाला हादरवून सोडतात आणि त्याचा परिणाम थिएटरबाहेर पडल्यानंतरही राहतो’, असं एका युजरने लिहिलंय. ‘प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पहावा’, असंही काहींनी म्हटलंय. ‘अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स’, अशा शब्दांत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे.