राजकारणात मन मोठं असावं लागतं, पण मला एक पुरस्कार काय मिळाला आणि यांची जळफळाट सुरू झाली असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी राज्याची संस्कृती दाखवली, पण उद्धव ठाकरेंनी विकृती दाखवली असं एकनाथ शिंदे म्हणाले. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार यांच्यावर अविश्वास दाखवणे हे दुर्दैव आहे. पवार साहेब परिपकव नेतृत्व आहे. एक पुरस्कार दिला तर एवढा जळफळाट व्हायचं कारण काय? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. राजकारणात मोठं मन हवं. आपण कमरेखाली कधीही वार केले नाहीत, कोणाबद्दल वाईट कधी बोललो नाही असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  औरंगजेबाची कबर छ. संभाजीनगरमध्ये मग नागपूर अचानक का पेटलं? धार्मिक संदेश लिहिलेले कापड जाळले…….

ठाकरेंनी विकृती दाखवली

एकनाथ शिंदे म्हणाले की, “महादजी शिंदे यांचा अपमान काही लोकांनी केला, साहित्यिकाचा अपमान केला. ज्यांना शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं त्यांनीच हा अपमान केला. शरद पवार यांनी राजकारणापलीकडे काम केलं आहे. पवार साहेब यांनी राज्याची संकृती दाखवली, तर या माणसांनी विकृती दाखवली. ही त्यांची खेकडा वृत्ती आहे, ही पोटदुखी आहे. हे कंपाउंडरकडून औषध घेतात. पोटदुखी थांबण्यासाठी चांगल्या डॉक्टरकडून औषध घ्या.”

घरात बसून काम होत नाही, हे शरद पवार यांनी सुद्धा आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मी काय काम केलं याची माहिती शरद पवारांनाही आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. दिल्लीसमोर गुडघे टेकणार नाही म्हणायचे आणि आता दिल्लीत काय करताय? असा प्रश्नही शिंदे यांनी ठाकरेंना विचारला.

अधिक वाचा  विधान परिषदेसाठी शहाजीबापूंचे एक पाऊल पुढे; फक्त यामुळं शहाजी बापूंना एकनाथ शिंदेंनी सकारात्मकता दाखविल्याचा शिष्टमंडळाचा दावा

ठाकरे गटाचे तीन खासदार शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी भोजनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवत आहेत. आधी माझ्यावरसुद्धा असात अविश्वास दाखवाला होता, माझं सुद्धा खच्चीकरण केलं होतं.

राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मातोश्रीशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या कोकणातल्या राजन साळवींनी आज ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा झेंडा हाती घेतला. ठाण्यातल्या आनंदाश्रमात त्यांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला. ठाकरेंसाठी आता आऊटगोईंग नवं राहिलं नसलं तरी साळवींचा शिवसेनाप्रवेश सोहळा मात्र त्यांना जबदरदस्त झटका देणारा होता. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला. पक्षप्रवेशानंतर बोलताना साळवी भावूक झाल्याचं दिसून आलं. जुनी शिवसेना सोडावी लागतेय यासाठी दु:खाचे अश्रू तर जुन्हा सहकाऱ्याच्या शिवसेनेत प्रवेश होतोय म्हणून आनंदाचे अश्रू डोळ्यांत असल्याचं साळवी म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी : भाजपकडून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी विविध समित्यांवर संधी