विधानसभा निवडणुकीपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील नियुक्त्या अखेर काँग्रेस पक्षाने आज (ता. 13फेब्रुवारी) जाहीर केल्या आहेत. त्या मागील अडीच वर्षांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळणारे विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस पक्षाने आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील वडेट्टीवार यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.
माजी विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. गेली पाच वर्षांपासून हे पद संगमनेरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. मागील खेपेला विरोधी पक्षनेतेपदाची इनिंग खेळणारे वडेट्टीवार यांच्याकडे आता विधीमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय या संघटनेतून विजय वडेट्टीवार यांनी महाविद्यालयीन शिक्षणापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, पुढे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे वडेट्टीवार यांना १९९८ मध्ये शिवसेनेने विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर २००४ मध्ये ते चंद्रपूरच्या चिमूरमधून विधानसभेवर निवडून आले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली वडेट्टीवार यांनीही २००५ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांना मंत्रिपद मिळाले होते. तेव्हापासून ते काँग्रेससोबत आहेत. पुढे राणेंनी काँग्रेस सोडली पण वडेट्टीवार हे काँग्रेससोबत कायम राहिले.
पुढे २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आणि वडेट्टीवार यांच्याकडे विधानसभेतील उपनेतेपद देण्यात आले होते. पुढे विखे पाटील हे भाजपसोबत गेल्यानंतर वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले होते. आता काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विधीमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे.
आगामी काळात काँग्रेस पक्षातील वरिष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन वडेट्टीवार यांना काम करावे लागणार आहे. काँग्रेस पक्षाची परिस्थिती तोळामोसाची असताना मोठ्या अवघड परिस्थितीत वडेट्टीवार यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. या माध्यमातून त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत पक्षाची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.