ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी तर काळजाला हात घालणारी प्रतिक्रिया दिली आहे. ये भी दिन निकल जाएंगे, अशी अत्यंत सूचक आणि बोलकी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.
राजन साळवी यांच्या सारख्या जुन्या जाणत्या आणि मास लीडर असलेल्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा शिंदे गटात प्रवेशही होत आहे. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती. त्यांनी आहेत त्या ठिकाणी खंबीरपणे पाय रोवून उभे राहायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे यांनी एकमेव निष्ठावंत म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. राजन साळवी दुसऱ्या पक्षात जात आहेत याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
थांबा, हे दिवस निघून जातील
पक्षप्रमुखांना ज्यांनी जायचं त्यांनी जावा असं म्हणण्याचा अधिकार आहे. पक्षप्रमुख हे बोलतात म्हणून आम्ही बोलायला लागलो हे चुकीचं आहे. पदाधिकाऱ्यांनी अशा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ये भी दिन निकल जाएंगे असा आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. थांबा, हे दिवसही निघून जातील, आपण एकत्र लढू, असं भास्कर जाधव यांनी म्हणाले.
एकमेव, एकनिष्ठ कुणाला म्हणायचे?
शिलेदार नेता आणि सरदार आहात म्हणून हे सरदारकीचे लक्षण नाही (विनायक राऊत यांना टोला) सरदारांनी आपल्या सैन्याला धीर दिला पाहिजे. असं वक्तव्य म्हणजे पळ काढण्यासारखं आहे. राजन साळवी आपला उल्लेख करताना एकमेव एकनिष्ठ असे म्हणायचे. आता एकमेव एकनिष्ठ कोणाला म्हणायचं हे रत्नागिरीत आल्यानंतर त्यांना विचारा, ते उत्तर देतील, असा टोला त्यांनी लगावला.
टायगर अभी जिंदा है
उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. रोज एक माणूस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांना खेचलं जात आहे. त्यामुळे लोक अमिषाला बळी पडत आहे. आम्ही जाणाऱ्यांना थांबवत नाही, राजकारणात, व्यवहारात सूडाचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 13 खासदार, 40 आमदार फोडूनही उद्धव साहेब दबावाला बळी पडत नाहीत म्हणून या लोकांची झोप उडाली आहे. टायगर अभी जिंदा हैं, असं ते म्हणाले.