राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येत आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या भरवशावर उभ्या असलेल्या केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर हे ठाकरेंच्या दोन खासदारांमुळे बारगळलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सगळ्या खासदारांनी एकत्र येत पक्षात एकजूट असल्याचे दाखवत पक्षफुटीच्या चर्चा निरर्थक असल्याचा दावा केला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केले. ऑपरेशन टायगरनुसार, शिंदे गटात ठाकरेंच्या माजी लोकप्रतिनिधींचा पक्षात प्रवेश सुरू होता. तर, दुसरीकडे खासदारही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते.
ऑपरेशन टायगर का बारगळलं?
दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसाठी सुरू करण्यात आले होते. शिंदेंच्या जाळ्यात काही खासदारही आले. पण, दोन खासदारांनी नकार दिल्याने हे ऑपरेशन बारगळल्याचे म्हटले जात आहे. शिंदेच्या ऑफरला नकार देणारा खासदार हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहेत. त्यापैकी 6 ते 7 खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, एका सूत्राच्या माहितीनुसार 5 खासदार गळादेखील लागले. मात्र, त्यानंतर आलेल्या नकारानंतर हे ऑपरेशन बारगळले असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे काय करणार?
ऑपरेशन टायगरमध्ये खासदारांचा गट फुटत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या ही मोहीम योग्य वेळी सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केले आहे. त्यामुळे तूर्तास या लहान ऑपरेशनसाठी घाई करणार नसल्याचे शिंदे गटातील सूत्रांनी सांगितले. ठाकरेंचे खासदार फुटले असते तर शिंदे गटात अथवा भाजपात त्यांनी प्रवेश केला असता. त्याच्या परिणामी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरील अवलंबित्व कमी झाले असते.