मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली.मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य करत तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला आहे.
न्याय कधी मिळणार?
जन्मदात्या बापाची क्रूर हत्या झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटून गेल्याचं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले. 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपींना पकडलं असलं तरी मास्टरमाईंड अद्यापही समोर आलेला नाही. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे परराज्यात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली आहे. “तो कोकरू आहे, कुठेही लपला तरी तो सापडेल. पोलिस आणि गृहविभागावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आकाच्या आकाची पिलावळ आहे आणि त्यांचा माज जिरणार आहे.” असं धस म्हणाले यावेळी त्यांनी तपासाच्या काही गोष्टी गोपनीय असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलं.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
माझे दुःख कमी होत नाही. दुःख वाढत चालले आहे. न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत. मात्,र माझा भाऊ कुठून येणार? त्यासाठी कोणते दार ठोठवायचे वेदना भयानक असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. कृष्णा आंधळे कागदोपत्री दोन महिने फरार होता. त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार कोण? हे प्रशासनाने आम्हाला सांगावे, असा सवालही धनंजय यांनी केला आहे.
आरोपींना अभय देत गेला म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या. एसआयटी आणि सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र घटना घडल्यानंतर आरोपींचे मोबाईल सुरूच होते. कोणतेही मोबाईल स्ट्रेस केले नाही. ही सहजपणे गोष्ट घेण्यात आली. गांभीर्याने घेण्यात आली नाही. शोध होत नाही म्हणून म्हटलं जात आहे. गु्न्हेगाराला अभय दिल्याने मोठी घटना घडली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून हे कागदपत्रे देखील सिद्ध करून दाखवणार आहोत, असं धनंजय देशमुखांनी म्हटले.