पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेतदरम्यान ३२.४ किलोमीटर लांबीचा नवीन सेवारस्ता तयार होणार आहे. दोन मार्गिका असणारा हा रस्ता असून, यासाठी ६०४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयाने याला मंजुरी दिली आहे.
मार्च २०२५ पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यासाठी ९० टक्के भू-संपादनाचे काम पूर्ण केले आहे, तर उर्वरित १० टक्के पुणे महापालिका भू-संपादन करत आहे. या नव्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी कमी होणार आहे.
नऱ्हे, नवले पूल, वारजे, चांदणी चौक व रावेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची होणारी कोंडी व नऱ्हे, नवले पुलाच्या परिसरात अपघाताचे प्रमाण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता तयार करणार आहे. एका बाजूच्या सेवा रस्त्यावर दोन मार्गिका असणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे.
सध्या या रस्त्यावरून दररोज सुमारे दोन लाख १० हजार वाहनांची वाहतूक होते. या सेवा रस्त्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. खेड शिवापूर ते रावेत असा प्रवास करण्यासाठी सध्या ४५ मिनिटे ते एक तास वेळ लागतो. सेवा रस्त्यामुळे वेळेत बचत होण्यास मदत होईल.
तीन टप्प्यांत काम
१. खेड शिवापूर ते कात्रज नवीन बोगदा
२. वारजे ते बालेवाडी
३. वाकड ते रावेत
असा असेल प्रकल्प
१. खेड शिवापूर ते रावेतदरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूने ३२.४ किलोमीटर लांबीचा सेवारस्ता
२. दोन्ही बाजूने दोन मार्गिका
३. एक मार्गिका ३.५ मीटरची असणार
४. रोज किमान एक लाख वाहनांना याचा थेट फायदा
असा होईल फायदा
मुख्य मार्गावरील वाहतूक कमी होईल, परिणामी वाहतूक कोंडी टळेल
लहान वाहनांसाठी व स्थानिक रहिवाशांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार
अपघाताचे प्रमाण कमी होईल
प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी वाचेल
इंधनात बचत
वाहतूक जलद होण्यास मदत
भू-संपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मार्च महिन्यापासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
– सुभाष घंटे,
वरिष्ठ अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे