मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा या पहिल्यांदा होताना दिसत नाहीयत. याआधीदेखील सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत चर्चांना उधाण आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडला होता. त्यानंतर महायुतीत पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. रायगडमध्ये तर मोठा वाद उफाळून आलेला बघायला मिळाला. तिथे शिवसैनिकांनी जाहीरपणे भूमिका मांडली. या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतून ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितत राहण्याचं पसंत केल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींवर महायुतीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेसाठी शहाजीबापूंचे एक पाऊल पुढे; फक्त यामुळं शहाजी बापूंना एकनाथ शिंदेंनी सकारात्मकता दाखविल्याचा शिष्टमंडळाचा दावा

राज्य मंत्रिमंडळाची काल मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात न जाता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणं पसंत केलं. शिंदे हे खासगी कारणास्तव प्रत्यक्षपणे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. पण यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रत्यक्ष अनुपस्थितीवर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शिंदे हे लढवय्ये नेते’, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य

“एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकले ननाहीत. पण ते व्हिसीद्वारे उपस्थित राहिले. अशा छोट्या गोष्टींवरुन नाराज होणारा तो नेता नाही. ज्या शिंदेंनी 50 आमदार घेऊन महायुतीचं सरकार स्थापन केलं, त्यांनी ते धाडस केलं. शिंदे हे लढवय्ये नेते आहेत. त्यांच्या नाराजीचा वावड्या उठवणं हे विरोधकांनी बंद करावं”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ‘या’ नेत्याला देणार संधी

‘शिंदे हे नाराज नाहीत’, बावनकुळेंची प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. ते माझ्यासोबत बोलले होते. त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा वेळ लागला. त्यामुळे ते स्वत:हून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की, तुम्ही बैठक सुरु करा. काही नाराजी नव्हती. आम्ही परवाच भेटलो. तुम्हीच मीडियाच्या माध्यमातून कल्लोळ उभे करता. आम्ही सर्व मस्त आणि आनंदी आहोत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.