राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि साथीदारांनी बांधकाम व्यावसायिकासह दोघांना मारहाण केल्याची घटना सूसगाव परिसरात घडली. याबाबत बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रशांत शंकर जाधव (वय ४८, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जाधव हे तीर्थ डेव्हलपर्सचे बांधकाम व्यावसायिक विजय रौंदळ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांना २५ जानेवारी रोजी दुपारी काहीजण सूसगाव येथील तीर्थ डेव्हलपर्सच्या जागेवर पोकलंडच्या साह्याने खोदकाम करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे जाधव यांनी खोदकाम करणाऱ्या कामगारांना विचारणा केली. त्यावेळी चांदेरे तेथे आले. त्यांनी जाधव यांच्या कानशिलात मारली. जाधव यांनी फोन करून विजय रौंदळ यांना हा प्रकार कळविला. रौंदळ तेथे आल्यानंतर चांदेरे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, दगडाने मारून डोक्यास गंभीर दुखापत केली, असे जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बावधन पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक तेजस्वी जाधव करीत आहेत.

अधिक वाचा  जुन्या नव्यांचा संगम असलेल्या रोहित सेनेची चॅम्पियन्स ट्रॉफी कामगिरी; काय काय केले विक्रम? विजयी ‘पंच’… 9 महिन्यांतच दुसरी ट्रॉफी