मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिला लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची गणिते जुळवत महत्त्वाच्या शहरांवरती भारतीय जनता पक्षाची पकड कायम ठेवण्यासाठी मुख्य शिलेदारांना सर्वोच्च पदी नियुक्त करून महायुती 2.0 मध्ये वर्चस्व कायम ठेवले आहे. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रिपद, वाशिमचं पालकमंत्रिपद हसन मुश्रिफ यांच्याकडे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगलीचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रिपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रिपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचं वाटप करत असताना मुख्यमंत्र्यांनी समतोल साधण्याबरोबरच काही महत्त्वाचे संदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडेंना धक्का
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. भाजपा आमदार सुरेश धस त्यासाठी विशेष आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मागणी मान्य केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडंच बीडचं पालकमंत्रिपद कायम राहिले असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री असतील.
बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून आता अजित पवारांना आता नवं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
गडचिरोली मुख्यमंत्र्यांकडेच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले आहे. नक्षलवादाचा प्रभाव असलेला जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती. राज्यातील सर्वात अविकसित जिल्हा म्हणूनही गडचिरोलीचं नाव घेतलं जात असे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ही ओळख बदलण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले.
फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असतान गडचिरोलीचं पालकमंत्रिपद हे त्यांच्याकडेच होते. त्यानंतर मागील पाच वर्ष एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी हे पालकमंत्रिपद स्वत:कडे घेतलं आहे. 2025 ची सुरुवात गडचिरोलीतून करत फडणवीस यांनी त्याचे संकेत दिले होते. आजच्या यादीतून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
तटकरेंना धक्का
बीडप्रमाणेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदासाठी देखील महायुतीमध्ये स्पर्धा होती. शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात या पदासाठी स्पर्धा होती. त्यामध्ये तटकरे यांनी बाजी मारलीय. तर भरत गोगावले यांना मात्र कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही.
मुश्रीफांना कोल्हापूर नाही
रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षात राष्ट्रवादीनं बाजी मारली. पण, कोल्हापूरमध्ये या दोघांच्या संघर्षात शिवसेनेची सरशी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मिळालेलं नाही. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांकडं हा चार्ज देण्यात आलाय. त्याचबरोबर भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना सह-पालकमंत्री करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या भाजपाच्या टार्गेटवर असणार हे स्पष्ट झालं आहे.
राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे-
– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
– एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
– अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
– चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
– राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
– हसन मुश्रिफ – वाशिम
– चंद्रकांत पाटील – सांगली
– गिरीश महाजन – नाशिक
– गणेश नाईक – पालघर
– गुलाबराव पाटील – जळगाव
– संजय राठोड – यवतमाळ
– आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
– उदय सामंत – रत्नागिरी
– जयकुमार रावल – धुळे
– पंकजा मुंडे – जालना
– अतुल सावे – नांदेड
– अशोक उईके – चंद्रपूर
– शंभुराज देसाई – सातारा
– अदिती तटकरे – रायगड
– शिवेंद्रराजे भोसले – लातूर
– माणिकराव कोकाटे – नंदूरबार
– जयकुमार गोरे – सोलापूर
– नरहरी झिरवळ – हिंगोली
– संजय सावकारे – भंडारा
– संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
– प्रताप सरनाईक – धाराशिव
– मकरंद जाधव – बुलढाणा
– नितेश राणे – सिंधुदुर्ग
– आकाश फुंडकर – अकोला
– बाबासाहेब पाटील – गोंदिया
– प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री)
कोल्हापूर
– आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
– पंकज भोयर – वर्धा
– मेघना बोर्डीकर – परभणी
कोणाला डच्चू?
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली नाहीय. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. मुंडेंना पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी जोर धरत होती. मंत्री दत्तामामा भरणे यांना देखील पालकमंत्री पदापासून वंचित ठेवल्याने आले आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी वारंवार ती बोलूनही दाखवली होती. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.