ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवशी दुपारी खून प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे झाले असल्याचे कॉल रेकॉर्ड आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी १० दिवसांची पोलीस कोठडी आम्हाला मिळावी, असा युक्तिवाद विशेष चौकशी पथकाच्या वतीने सरकारी वकिलांनी केला. आरोपी आणि कराड यांच्यात १० मिनिटांचे बोलणे झाल्याचा दावाही तपास अधिकारी गुजर यांनी न्यायालयात केला. त्याचवेळी केवळ एका फोनकॉलच्या आधारे वाल्मिकला खून प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याचे सांगत वाल्मिकविरोधात यंत्रणांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा तोडीस तोड युक्तिवाद कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयासमोर केला.

अधिक वाचा  अशुद्ध तेल शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज? देवस्थानने घेतला हा मोठा निर्णय; भाविकांची लूट होण्याची शक्यता

वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्याला बीड कोर्टात हजर करण्यात आले. एसआयटीचे प्रमुख तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिकचा खून प्रकरणात सहभाग आहे याचा पुरावा आमच्याकडे असल्याचे न्यायालयाला सांगितला. त्यासाठी खून प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड याच्या फोनचे डिटेल्स सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सादर केले.

वाल्मिक कराड याचे वकील ठोंबरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाच्या कामकाजात सहभागी

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात काय बोलणे झाले याचा आम्हाला तपास करायचा आहे. तसेच कराड याने हत्येच्या दिवशी देशमुख यांना धमकी दिली होती, असेही आम्हाला चौकशीत कळाले असल्याचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयाला सांगितले. सरकारी वकिलांचा अतिशय आक्रमक युक्तिवाद पार पडल्यानंतर बचाव पक्षाकडून अॅड ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होऊन सरकारी पक्षाचा एक एक युक्तिवाद खोडायला सुरुवात केली.

अधिक वाचा  विराट कोहली की रजत पाटीदार? आरसीबीच्या कर्णधारपदी कोण? आयपीएल 18 व्या मोसमाआधी मोठी घोषणा

आरोपी वाल्मिक कराड याच्या वकिलांचा न्यायालयात तोडीस तोड युक्तिवाद

एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच तपास यंत्रणांनी मांडलेल्या मुद्द्यांना ठोंबरे यांनी प्रखर विरोध दर्शवला. कोणत्याही आरोपीने वाल्मिक कराड याचे नावे घेतलेली नाहीत, याकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. खून प्रकरणात वाल्मिकविरोधात एसआयटीकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असे सांगत केवळ एका फोन कॉलवरून खुनाच्या आरोपात कसे नाव घेतले जाऊ शकते, असा उलट सवाल अॅड. ठोंबरे यांनी सरकारी पक्षाला केला.

खंडणीच्या गुन्ह्याचा संबंध खून प्रकरणात लावण्यात येतोय, असे सांगत नियमानुसार हा गुन्हा लागू शकत नाही. कराड यांची अटक बेकायदेशीर असल्याचा मोठा युक्तिवाद अॅड ठोंबरे यांनी केला. सरतेशेवटी मीडिया ट्रायल करून हा खून खटला उभा करू नका, अशी विनंती अॅड. ठोंबरे यांनी न्यायालयाला केली. अॅड ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकून एका फोन कॉलवर तुम्ही वाल्मिकला खून प्रकरणात आरोपी केले आहे का? अशी विचारणा न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी केली.