बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात यंत्रणांच्या कारवाईला वेग आला आहे. एसआयटीने वाल्मीक कराडचा ताबा घेतला असून त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी देखील या बाबत कारवाई सुरु केली आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी बर्खास्त करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिला असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त झाल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारीच बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारीच बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. बिड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली.
दरम्यान, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी नव्याने नियुक्त करताना चारित्र्य पडताळणी करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीने घेतला आहे. बुधवारी वाल्मिकला घेऊन केज कोर्टाकडे रवाना झाली. मकोका प्रकरणी केज कोर्टात सुनावणी होणार आहे.