संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एका महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. अशातच आज देशमुख कुटुंबही आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. याप्रकरणाच्या तपासाची कोणतीही माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केलं. दरम्यान, आता संतोष देशमुख यांच्या लेकीनंही प्रशासनाला संतप्त सवाल केला आहे.

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ”माझ्या वडिलांना यांनी रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार असेल? प्रशासन नक्की करत आहे? आज माझे पप्पा गेले, उद्या जर काकाला काही झालं तर आम्ही काय करायचं?” अशा प्रश्न तिने प्रशासनाला विचारला.

अधिक वाचा  परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

पुढे बोलताना, ”आज काका टाकीवर चढले. यानंतर आम्हीही काकांप्रमाणे टाकीवर जाऊ. कुटुंबातील सगळे टाकीवर जातील, तेव्हाच पोलीस आरोपींना पकडतील का?” अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

”माझे काका गेल्या चार दिवसांपासून तणावात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत काय तपास झाला, हे आम्हाला सांगा एवढीच आमची मागणी आहे. केवळ पोलीस येतात आणि उभे राहतात. नक्की काय तपास सुरु आहे, कुणीही सांगत नाही. आम्हाला जी माहिती मिळते, ती माध्यमातून मिळते. मग यासाठी आम्ही जर टोकाचं पाऊल उचललं तरच पोलिसांचे डोळे उघडणार आहेत का?” असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

अधिक वाचा  कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर

”पोलीस घरासमोर असतानासुद्धा माझे काका घरातून बाहेर पडून टाकीवर गेले, पण पोलिसांना माहिती पडलं नाही. माझ्या वडिलांनाही रस्त्यावरून उचललं. आता काकाच्या जिवाला काही झालं तर प्रशासनाचा दारासमोर असूनही काय फायदा? अजूनही एक आरोपी फरारच आहे. त्याला कधी पडकणार? इतके दिवस आम्ही शांतपणे न्याय मागतो आहे. आता टोकाचं पाऊल उचललं तरच आम्हाला न्याय मिळणार का?” असंही ती म्हणाली.