मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेला, मात्र, अद्यापही एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास 2 ते 3 तास हे आंदोलन चालले. पोलिसांचे आश्वासन आणि मनोज जरांगेंच्या मध्यस्थीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले.
धनंजय देशमुख ज्या टाकीवर चढले होते. तिच्याच बाजुला एक दुसरी टाकी आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी बाजुच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांची समजूत घालण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बीडचे एसपी कॉवत यांनी मोबाईलवरुन धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली. मात्र, पोलिस संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासात कुचराई करत आहेत. त्यांना विष्णू चाटे यांचा मोबाईल अद्याप हस्तगत करता आला नाही. ते आम्हाला तपासाची माहितीही देत नाहीत. या प्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत धनंजय देशमुख यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. मी एसआयटीचे अधिकाऱ्यांशी बोलणे करून देतो, असे आश्वासन एसपी कॉवत यांनी दिल्यानंतर तसेच मनोज जरांगे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले.
खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत पत्रकारांनी संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याबाबत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले.
धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. SIT वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील. सध्या मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, असे बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी म्हटले आहे.
वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल का, असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचे नाव घेतले आहे, त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे, त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असे स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कॉवत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
दरम्यान, टाकीवरून खाली उतरल्यानंतर देशमुख यांच्यासह गावकऱ्यांनी राज्य सरकारला उद्या (14 जानेवारी) सकाळी 10 वाजेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. कृष्णा आंधळे आरोपी अद्यापही मोकाटच आहे. आंधळेला तत्काळ अटक करावी. तसेच वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करुन मोक्का लावण्याची मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे.