हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला आता राजकीय वळण दिलं जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणा विधानसभेत या घटनेबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत त्याच्याविरोधातील आरोपांना प्रत्युत्तर दिलं. आता याप्रकरणी विधान परिषद सदस्य वेंकट बालमूर यांनी अल्लू अर्जुनवर निशाणा साधला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी अल्लू अर्जुनला घडलेल्या घटनेविषयी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हिडीओत वेंकट म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर जेव्हा शनिवारी अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते पश्चात्तापातून होतं, असं मला वाटलं होतं. कारण संध्या थिएटरमध्ये काय घडलं हे माहीत असूनही तुझ्या व्हिडीओ फुटेजमध्ये दिसतंय की तू चित्रपट पाहिलंस, टाळ्या वाजवल्यास आणि रॅलीसह थिएटरमधून बाहेर पडलास. तरीही त्यावेळच्या घटनेबद्दल तुला काहीच माहिती नव्हती असं तू दाखवतोय. ठीक आहे. पण नंतर दुसऱ्या दिवशी ही घटना कळल्यानंतरही तू तुझ्या घरासमोर फटाके फोडलेस, ज्याकडे आजपर्यंत आम्ही लक्ष वेधलं नव्हतं.”

अधिक वाचा  ”पप्पांना रस्त्यावरून उचलून नेलं, आता काकांना काही झालं तर…”; आम्हीही काकांप्रमाणे…. संतोषच्या लेकीचा संताप!

अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत म्हटलं की त्याला फक्त तेलुगू लोकांमध्ये आनंद निर्माण करायचा होता. परंतु ते एखाद्याच्या जिवाच्या किंमतीवर येऊ शकत नाही, असंही वेंकट यांनी म्हटलंय. “तू म्हणालास की तुला तेलुगू लोकांचा अभिमान आहे. परंतु जेव्हा अशा प्रकारची एखादी घटना जाणूनबुजून किंवा नकळतपणे घडते, जेव्हा लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्हाला थोडी सहानुभूती दाखवण्याची आणि पीडितेच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज असते. ज्याने चूक केली असेल, मग तो कोणीही असो.. त्याला शिक्षा करणारच हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असताना अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणं योग्य नाही. मी तुला आत्मचिंतन करण्याचा आणि तुझे शब्द मागे घेण्याचा सल्ला देतो”, असं त्यांनी पुढे म्हटलंय.

अधिक वाचा  दिल्ली विधानसभा निवडणुक तारीख जाहीर, संपूर्ण वेळापत्रक पाहा

अकबरुद्दीन ओवैसी विधानसभेत म्हणाले, “मला मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या अभिनेत्याला जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा त्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी देखील त्याला सांगितलं होतं की चेंगराचेंगरी झाली आणि त्यात दोन मुलं पडली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी अभिनेता त्यांच्याकडे वळला, हसला आणि म्हणाला की आता चित्रपट हिट होईल.”

रेवंत यांनी त्या सर्व कलाकारांवर टीका केली, ज्यांनी अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याची भेट घेतली, मात्र त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये जाण्याची किंवा रोड शो करण्याची परवानगी नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “महिलेच्या मृत्यूबद्दलची माहिती देऊनही त्याने हलण्यास नकार दिला तेव्हा डीसीपींनी त्याला बळजबरीने बाहेर आणलं. जर त्याने थिएटर सोडलं नसतं तर त्याला अटक करावी लागेल, असं पोलिसांनी त्याला सांगितलं,” असं रेवंत रेड्डी म्हणाले.

अधिक वाचा  अजितदादांच्या ‘त्या’ आमदाराकडून थोपटेंना डबल धक्का; निवडणुकीत धोबीपछाड, आता खास शिलेदारचं फोडला!

या आरोपांनंतर शनिवारी संध्याकाळी अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. “माझ्या आयुष्यातील ही सर्वांत खालच्या पातळीची गोष्ट आहे. मलाही त्याच वयाचा मुलगा आहे. मी वडील नाही का? एका पित्याला काय वाटत असेल हे मी समजू शकत नाही का”, असं म्हणत तो भावूक झाला होता.