नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून त्या प्रश्नाला उत्तर दिली जात आहेत. परभणीचं प्रकरण, त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचं प्रकरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सभागृहात चांगलंच गाजलं. यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला तर त्यावर बोलताना सत्ताधाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आज हिंदूत्त्वाचा मुद्दा चांगलाच गाजला. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे मंत्री नितेश राणे आणि सपाचे आमदार अबू आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
साहेब म्हणतात मशिदीत घुसून मारू, का मारणार आमची काय चूक आहे? मी कुराण वाचू देणार नाही, मी स्पीकर बंद करेल. अध्यक्ष मोहोदय हा देश हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रेमाचा देश आहे. इथे सर्व एकत्र राहातात. प्रेम करा असं आमची संस्कृती आम्हाला शिकवते, जेव्हा दिवाळी आणि होळी येते तेव्हा मुस्लीम बांधव हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात. जेव्हा ईद असते तेव्हा हिंदू बांधव मुस्लिमांना शुभेच्छा देतात, असं आझमी यांनी म्हटलं.
नितेश राणे यांचं उत्तर
यावर बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, अबू आझमीजी जे भाईचारा वगैरे बोलत आहेत त्यात चुकीचं काही नाही. पण ते चुकीची माहिती देत आहेत. दुसरी बाजू समजून घेत नाहीत. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर कोण दगड मारतं? आमचे मंदिर कोण तोडतं? हे भाईचाऱ्याचे लेक्चर जर त्यांनी फतवा काढणाऱ्या लोकांना वेळत दिले असतेना तर अशी भाषण देण्याची वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टी अध्यक्ष मोहोदय त्यांना निट समजून सांगा, आम्हाला त्यांचं भाषण ऐकायचं आहे, आता आम्ही मंत्री झालो आहोत आता आम्ही ऐकणार काही हरकत नाही. पण त्यांनी वस्तुस्थिला धरून बोलाव. खरी परिस्थिती काय आहे? ही महाराष्ट्रातील जनता ओळखते असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.