मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) महासुर्याची माऊली माता भिमाई यांचा १२८ स्मृतिदिन व थोर समाजसुधारक, संत गाडगे महाराज यांचा ६८ वा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने संयुक्तरित्या कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल – १२ येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी रसाळवाणीने अत्यंत मुद्देसुद व प्रभावीपणे केले, प्रस्ताविक सादर करीत असताना माता भिमाई व संत गाडगे महाराज यांचा संपूर्ण जीवनपट मांडून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, संत गाडगे महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा एकमेकांबद्दल असलेला आदर, जिव्हाळा, प्रेम त्यांनी विविध घटनांच्या माध्यमातून मांडत त्यावर प्रकाश टाकला, तसेच तथागत गौतम बुद्धांची माता ही बालपणीच गेली त्याचप्रमाणे बाबासाहेबांची माऊली माता भिमाई यादेखील बाबासाहेबांच्या बालपणीच गेल्या त्यामुळेच दोघांचे ही बालपण एका समांतर रेषेवर अधोरेखित झाले हे साम्य ही राजेश घाडगे यांनी नमूद केले व माता भिमाई व समाजसुधारक गाडगे महाराज या दोघांना साश्रू नयनांनी मानवंदना दिली. तद्नंतर सामाजिक कार्यकर्ते सहकार कार्यमहर्षी व ओबीसींचा आधारस्तंभ असलेले पांडुरंग साळवी यांनी देखील माता भिमाई व संत गाडगे महाराज यांच्या विषयी मौलिक असे विचार मांडले तसेच “महाराष्ट्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू तुकाराम, राष्ट्रपिता महात्मा फुले, जननायक बिरसा मुंडा, शाहू महाराज, माता जिजाऊ, माता भिमाई, माता रमाई, माता सावित्री आदी जे जे महापुरुष होऊन गेलेत त्यांच्या जयंती उत्सव व स्मृतिदिन यांचे आयोजनबौद्धजन पंचायत समितीच्या वतीने खेड्यापाड्यापासून मोठ्या शहरापर्यंत झाले पाहिजे जेणेकरून बहुजन समाजाला आपल्या महापुरुषांच्या कर्तृत्वाची जाणीव होईल, त्यांचा इतिहास, कार्य, बलिदान, विज्ञानदृष्टी, महत्वकांक्षा, ध्येय-उद्देश नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचेल व ते ही त्या मार्गाने पुढे जाऊ शकतील, तसेच बौद्धजन पंचायत समितीने माता भिमाई यांचा १२८ वा व संत गाडगे महाराज यांचा ६८ वा स्मृतिदिनी अभिवादन सभेला मला बोलवले हे मी माझे भाग्य समजतो” असे नमूद करीत माता भिमाई व संत गाडगे महाराज यांना अभिवादन केले.

अधिक वाचा  वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप? मंत्रालयात सामुहीक आत्मदहन करण्याचा इशाराही धनंजय मुंडेंही अडचणीत?

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी अध्यक्षीय भाषण सादर करताना “६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी संत गाडगे महाराज यांनी तेरा दिवस अन्नपाण्याचा त्याग केला अखेर चौदाव्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांची ही प्राणज्योत मावळली अस गुरू-शिष्याच अतूट नात होत, तसेच संत गाडगे महाराज आजारी असताना बाबासाहेब भायखळा येथे त्यांना भेटायला गेले होते तेव्हा दोन्ही महामानव एकमेकांना मिठीत घेऊन रडू लागले त्यावेळी गाडगे महाराज म्हणाले की “बाबासाहेब तुम्ही समाजासाठी चंदनापरी झिजत आहात इतके महान कार्य करत असतानाही वेळात वेळ काढून माझ्यापर्यंत पोहोचलात” तेव्हा बाबासाहेब म्हणाले की “गाडगे महाराज तुम्ही आमच्या बहुजनांचे बाबा आहात” यातून गुरू-शिष्याचं असलेलं अतूट नाते लक्षात येते, गाडगे महाराजांनी अनेक धर्मशाळा निर्माण केल्या त्यातील काही धर्मशाळा त्यांनी बाबासाहेबांना चळवळीच्या कामकाजासाठी दान केल्या अश्या गाडगे महाराजांनी बाबासाहेबांच्या जाण्याचा धसका घेतला व अन्नपाणी त्यागून चौदाव्या दिवशी प्राणत्याग केला, असे हे महापुरुष होते त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजातील विषमता, अंधश्रद्धा, दृष्ट रूढी-परंपरा, अन्यायी प्रवृत्ती यांचा बिमोड करण्याचे काम आपण केले पाहिजे” असे नमूद करून माता भिमाई व संत गाडगे महाराज यांना अभिवादन केले.

अधिक वाचा  विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, जामीनही मागण्याची शक्यता खंडणीचा तपास पूर्ण; SIT कडून होऊ शकते अटक

सदर कार्यक्रमास कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, खजिनदार नागसेन गमरे, सरचिटणीस राजेश घाडगे, सहकारमहर्षी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साळवी, चिटणीस यशवंत कदम, विश्वस्त राजाभाऊ गमरे, बौद्धचार्य संतोष तांबे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, चिटणीस विजय जाधव, कर्मचारीवृंद संजय मोहिते, प्रदीप तांबे, राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सरतेशेवटी सर्वांनी माता भिमाई व संत गाडगे महाराज यांना साश्रू नयनांनी अभिवादन केले व सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सदर अभिवादन सभेची सांगता केली.