बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. आज शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते.

शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला. शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सात्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पावरांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असं गावकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?

आम्हाला काहीच नको, न्याय हवाय-

पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, न्याय हवाय, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं-

बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. यावरुन आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत आहे, तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे.