कोणत्याही धार्मिक स्थळी भेट दिली असता तिथं स्वखुशीने भाविक काही रक्कम दान देतात. दानपेटी, दक्षिणापेटी, हुंडी, किंवा मंदीर संस्थानाच्या खिडकीवर ही रक्कम दिली जाते. पण, सध्या मात्र मंदिरातील याच दानावरून एक वादंग माजल्याचं पाहायला मिळत आहे.

तामिळनाडूच्या चेन्नईनजीक असणाऱ्या अरुलमिगु कंदास्वामी मंदिरात ही घटना घडल्याचं म्हटलं गेलं. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात सध्या घडलेल्या एका विचित्र घटनेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे, जिथं एका भाविकानं चुकून दानपेटीमध्ये त्याचा iPhone गमावला आणि एकच गोंधळ माजला.

विनायकपुरमचे मूळ निवासी असणारे दिनेश त्यांच्या पत्नी आणि मुलांसह काही दिवसांपूर्वीच या मंदिरात पोहोचले होते. एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहाच्या वृत्तानुसार पूजाअर्चना केल्यानंतर हुंडीमध्ये दान स्वरुपात पैसे टाकण्यासाठी म्हणून त्यांनी खिशात हात टाकला. पण, तेव्हाच त्यांचा iPhone सुद्धा चुकून हुंडीमध्ये पडला. ही हुंडी म्हणजे दक्षिणेकडील मंदिरांमध्ये असणारी दानपेटी बरीच उंचावर असून त्यावर लोखंडी जाळीसुद्धा होती. ज्यामुळं दिनेश यांना त्यातून फोन काढता आला नाही.

अधिक वाचा  धनंजय मुंडे-छगन भुजबळ भेटीची पाच कारणं? ओबीसींच्या सभांमध्ये एकत्रही दिसण्याची शक्यता

आपला फोन बाहेर काढणं अशक्य असल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला पण तिथं त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जी वस्तू दानपेटीमध्ये टाकली जाते ती देवाचीच होऊन जाते आणि ती परत केली जात नाही. परंपरेनुसार हुंडी दोन महिन्यांतून एकदाच उघडली जाते, असं व्यवस्थापनाकडून त्यांना सांगण्यात आलं.

हे प्रकरण इथंच थांबलं नाही. हुंडी जेव्हा उघडण्यात आली तेव्हा तरी आपल्याला आपला मोबाईल परत मिळेल अशी दिनेश यांना अपेक्षा होती. पण, मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार हा फोन आता देवाचीच संपत्ती असल्यामुळं ती परत करणं विचाराधीन नसेल. दिनेशला फक्त त्याचं सिमकार्ड आणि डेटा देण्याचा प्रस्ताव आता पुढे करण्यात आला असून, हीच घटना कोणा दुसऱ्यासोबत घडली असती तरीही इथंही तसाच न्याय लागू असता असं स्पष्टीकरण मंदिरातून देण्यात आलं आहे.