सचिन तेंडुलकरने एखाद्या क्रिकेटपटूच कौतुक केलं, तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार. तो उदयोन्मुख क्रिकेटर असेल, तर त्याच्याकडे सगळ्यांचच लक्ष जाईल. कदाचित त्याचं नशिबही पालटेल. असच काहीस होऊ शकतं एका 12 वर्षाच्या छोट्या मुलीसोबत. तिच्यासाठी सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केलीय. तिच्या मदतीसाठी आता देशातील सर्वात मोठे उद्योगपती पुढे आले आहेत. ही 12 वर्षांची मुलगी आहे, सुशीला मीणा. ती राजस्थानात राहते. सध्या ती तिच्या बॉलिंग Action मुळे चर्चेत आहे.
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका गावातील छोट्याशा मैदानात ती बॉलिंग करताना दिसतेय. पण हा व्हिडिओ फक्त बॉलिंगमुळे नाही, तर Action मुळे चर्चेत आहे. स्लो मोशनमध्ये या व्हिडिओत सुशीला डावखुरी वेगवान गोलंदाजी करताना दिसते. तिचा हा व्हिडिओ पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची आठवण येते. या व्हिडिओने सचिन तेंडुलकरच सुद्धा लक्ष वेधून घेतलं.
झहीरने काय म्हटलं?
सचिनने शुक्रवारी 20 डिसेंबरला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुशीलाचा हा व्हिडिओ पोस्ट केला. यात सुशीलाची बॉलिंग Action स्मूद आणि सुंदर असल्याच सचिनने म्हटलं. सचिनने झहीर खानला टॅग करत सुशीलाच्या Action मध्ये झहीर खानची झलक दिसते असं म्हटलं. झहीरने सुद्धा सचिनच्या मताशी सहमती दर्शवली. Action खूप प्रभावी आणि दमदार असल्याच झहीरने लिहिलं.
सचिनच्या पोस्टने काम झालं
राजस्थानच्या एका शेतकरी कुटुंबातून येणारी सुशीला एका प्रायमरी शाळेत शिकते. ती क्रिकेट कशा परिस्थितीत खेळत असेल, तिच्याकडे काय साधनं असतील? हे सांगण कठीण आहे. पण शहरांच्या तुलनेत हे सोप नसेल. तिच्या टॅलेंटला योग्य दिशा देण्यासाठी मदतीची गरज आहे. असं वाटतय की सचिनच्या या पोस्टने अपेक्षित होतं ते काम झालय.
कुठला उद्योगसमूह मदतीसाठी पुढे आला?
सचिनच्या या पोस्टला देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आदित्य बिर्ला ग्रुपने प्रतिसाद दिलाय. कुमार मंगलम बिर्ला यांच्या कंपनीने अधिकृत एक्स हँडलवर लिहिलय की, ‘‘फोर्स फॉर गुड’ अभियानातंर्गत आम्हाला सुशीलाला क्रिकेट ट्रेनिंग द्यायची आहे’ फक्त सुशीलापर्यंत आता ही मदत पोहोचावी, जेणेकरुन तिला तिची स्वप्न जगता येतील अशी अपेक्षा आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची नेटवर्थ 18 लाख कोटीच्या घरात आहे.