राज्यात महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर देखील अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र त्यानंतर अजूनही मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलेलं नाहीये. खाते वाटप रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
खात मिळणार आहे, मात्र शपथ घेतल्यानंतर आता आपलं मंत्रिपदाचं काम सुरू झालं आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये खाते वाटप जाहीर होईल. खाते वाटपला विलंब झालेला नाहीये, पण एक दोन खात्याबद्दल तिघांमध्ये वाद आहे. तिघे जण एकत्र बसतील आणि चर्चा करतील, त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये खात्याचं वाटप होईल. कुठलही खातं मिळालं तर शेवटी खातं हे खात असतं. कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही, पाच वर्षांचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद भेटलं आहे. मला वाटतं दुसऱ्यांदा कबॅनेट मंत्रिपद भेटणं ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.