बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलंय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे विधीमंडळात दिसले नाहीत. आज अखेर त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत घेत भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, हत्येचं समर्थन कोणीच करु शकत नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमची सर्वांचीच होती. त्यात आरोपी अटक झाले आहेत. एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी नेमल्यानंतर अगदी शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. कोण होतं काय होतं? आदल्यादिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ एक पोलीस अधिकाऱ्यासोबत हॉटेलमध्ये चहा पित आहेत, असा व्हिडीओ समोर आलेला आहे. तो व्हिडीओही सर्व चॅनल्सवर पाहिलेला आहे. या सर्व गोष्टी तपास यंत्रणेने काढणे गरजेचे आहे.
या प्रकरणात मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री बोलले आहेत. मकोका लावायचा असे प्रकरण बीड जिल्ह्यात आहेत. त्याही प्रकरणात मकोका लागला पाहिजे. या भूमिकेचा मी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर निवेदन केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक यामध्ये सर्वांचं समाधान झालेलं आहे. या प्रकरणाला माझ्याशी जोडणं आणि माझ्यावर आरोप करणं. या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. शेवटी पोलीस तपासणार आहेतच. पोलीस यंत्रणा तपास करत आहे. त्यांनी ही केस देखील सीआयडीकडे दिलेली आहे. या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, असंही मुंडे म्हणाले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे सांगितलं असतं की, वाल्मिक कराड नेमकं नागपुरात कुठे आहे? तर तेही काम पोलिसांनी केलं असतं. त्यांनाही अटक केली असती. या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांना फाशी झाली पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे.