महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वादग्रस्त संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे सखोल चौकशी करून शोधण्याची सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यामुळे धक्कादायक गोष्ट घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची वाढती नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरत असताना सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून दुसरीकडे वातावरण तापत असल्याने महायुती सरकारमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी दबाव वाढत असल्यामुळे खातेवाटपापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याजागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात प्रथमच खातेवाटप न होता अधिवेशन समारोपाला गेले.
परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री घेतील त्या निर्णयाप्रमाणे कारवाई होणार आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही अशी नर्माईची घेतलेली भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपापूर्वी खांदेपालट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केज तालुक्यातील अवादा एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी हात-पाय तोडण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने सीडीआर तपासण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले तसेच एनसीपी एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महायुती सरकार निष्कलंकित राहावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अतिदक्षता घेतली जात असतानाच बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आणि त्यादरम्यानच त्या जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रीपद दिल्यामुळे पक्षाच्या मूळ भूमिकेला छेद गेल्याची भावना बळवली आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समुदायाने भरघोस पाठिंबा दिलेला असतानाही ओबीसी समुदायाचा चेहरा असलेले छगन भुजबळ हेच मंत्रिमंडळात नसल्यामुळे समाजाच्या नाराजीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून छगन भुजबळ यांच्या पाठीमागे पाठिंबा वाढत असून ही भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. कॅबिनेट मंत्री संधी दिलेल्या नेत्याच्या वाढलेल्या अडचणी आणि संधी नाकारलेल्या नेत्याच्या साठी वाढणारा दबाव या दुहेरी अडचणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडकला आहे. त्यामुळेच खाते वाटपापूर्वी नवीन चेहऱ्याला संधी देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सुवर्णमध्य’ काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.