महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडला. तर 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. अनेक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाराजांची मनधरणी करण्याचं आव्हान महायुतीतील तिन्ही पक्षांसमोर आहे. तर दुसरीकडे मंत्रिपद मिळालं असताना देखील भाजपच्या पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ या नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माधुरी मिसाळ यांना विधिमंडळातच अश्रू अनावर झाल्याची माहिती समोर येत आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये माधुरी मिसाळ ढसाढसा रडल्या. माधुरी मिसाळ यांनी आपल्या मनातील सल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे आणि गिरीश महाजन यांच्यासमोर बोलून दाखल्याची माहितीही मिळत आहे.

अधिक वाचा  इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही नारायणन : रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार

माधुरी मिसाळ यांच्या नाराजीचं कारण काय?

माधुरी मिसाळ भाजपच्या वरिष्ठ आमदारांपैकी एक आहेत. मात्र आपल्यापेक्षा ज्युनिअर आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र आपल्याला राज्यमंत्रिपद देण्यात आलं ही खंत मिसाळ यांची आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ असून देखील कॅबिनेट मंत्रिपदासाठी डावललं गेलं. तर इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर संधी देण्यात आल्याचं देखील माधुरी मिसाळ यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोण आहेत माधुरी मिसाळ?

पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ 2009 ते 2024 अशा सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. विजयाचा चौकार लगावल्यानंतर भाजपने त्यांना राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेविका ते आमदार आणि आता राज्यमंत्री असा माधुरी मिसाळ यांचा प्रवास राहिला आहे. पुण्याच्या भाजप शहर अध्यक्षा देखील त्या राहिल्या आहेत.