कल्याण पश्चिमेकडील योगीधाम एरिआमधील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये झालेल्या मारहाणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाकडून मारहाण करण्यात आली. अखिलेश शुक्ला या इसमाने व त्याच्या कुटुंबाने त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या धीरज देशमुख यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. मराठी माणसाला मुंबईत, महाराष्ट्रात काहीच किंमत नसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजले. याप्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशा दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मात्र ज्यांनी मारहाण केली, याप्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अखिलेश शुक्ला यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, मात्र त्याला आता भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे’ असा दावा शुक्ला यांनी केला आहे.
अखिलेश शुक्लांचे स्पष्टीकरण काय ?
अजमेरा इमारतीत झालेल्या वादावर अखिलेश शुक्ला यांनी बाजू मांडत याप्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. आपल्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले,असे त्यांनी सांगितलं.
“आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, पण त्या वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. माझ्या बायकोला शिवीगाळ केली, तिचे केस पडकून तिला मारहाण करण्यात आली ” असा आरोपही शुक्ला यांनी पुढे केला . खरंतर हा शेजारीपणाचा जुना वाद असून त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत शुक्ला यांनी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.