महाराष्ट्रात भाजपच्या यशाचा एक मोठा भाग चंद्रशेखर बवनकुळे यांच्या नेतृत्वाला दिला जातो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारल्यानंतरही, २०२२ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून बवनकुळे यांनी पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २८८ जागांवर व्यापक रणनीती आखून प्रचंड यश मिळवले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती कशी होती आणि विजयाची कारणे काय? याबाबत सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न ३५ संघटनांनी भाजपच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या संघटनांनी कार्यकर्त्यांना बळ दिले, बूथ व्यवस्थापनात सहाय्य केले, आणि मतदारांशी थेट संपर्क साधला. या प्रयत्नांमुळे भाजपचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढल्या बावनकुळे म्हणाले. इंडियन एक्सप्रेसने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ओबीसी आणि मराठ्यांमध्ये प्रभावी पोहोच
भाजपने ३५३ ओबीसी पोटजातींमध्ये थेट प्रचार केला, ज्यामुळे मोठा पाठिंबा मिळाला. याशिवाय, मराठवाड्यात मराठा समाजाचा मोठा पाठिंबा पक्षाला मिळाला. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. मात्र त्यांचे टीकास्त्र भाजपविरोधात उलटले आणि पक्षाला याचा फायदा झाला.
बूथ व्यवस्थापनाची अनोखी रणनीती
लोकसभा निवडणुकीतील निकालांवरून धडा घेत भाजपने बूथ व्यवस्थापनात ३२ पॅरामिटर्सवर लक्ष केंद्रित केले.
‘ए’ श्रेणी बूथ्स (५०% पेक्षा जास्त मतदान): ३६,८०९
‘बी’ श्रेणी बूथ्स (३५-५०% मतदान): २९,१२९
‘सी’ श्रेणी बूथ्स (२०-३५% मतदान): २०,२७४
‘डी’ श्रेणी बूथ्स (२०% पेक्षा कमी मतदान): ११,३३४
या वर्गीकरणामुळे भाजपला कमकुवत ठिकाणे ओळखून रणनीती आखण्यास मदत झाली.
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने पक्षाला आत्मविश्वास दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने जमिनीवर काम करून महत्त्वपूर्ण विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “एक है तो सेफ है” मोहिमेने राज्यभर जनतेशी संपर्क साधला. गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही महाराष्ट्रात प्रचारासाठी मोठे प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६५ रॅली तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आक्रमक प्रचाराने मोठा प्रभाव पाडला.
फडणवीसांची मुख्यमंत्रीपदावर निवड
भाजप कार्यकर्त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी पात्र होते. त्यांच्या प्रशासन कौशल्यामुळे पक्षाच्या यशात त्यांचा वाटा मोठा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहकार्यभावनेने भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरली. महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये सुसंवाद असल्याचे बवनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र, ४३ मंत्रिपदांच्या मर्यादेमुळे इच्छुक कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना थोडा विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
महायुतीचा एकत्रित विजय
महायुतीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपचे मताधिक्य २.४८ कोटींवरून ३.११ कोटींवर गेले, तर महाविकास आघाडीचे मताधिक्य २.५० कोटींवरून २.१७ कोटींवर खाली आल्याचे देखील बावनकुळेंनी सांगितले.