मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, व राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यामुळे, आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच, कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार याचीही चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर राज्यातील वेगाने वाढणारं शहर म्हणून पुणे शहराची देशभरात ओळख आहे. आयटी हब, सर्व्हिस सेक्टर, शैक्षणिक पंढरी आणि स्थलांतरीतांचे माहेरघर बनत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन आता चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार की चंद्रकांत पाटील या नावांमध्ये सध्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा केला जात आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल गंभीर आरोप; दोन्ही प्रकरणात एक आरोपी सुटला तर गाठ आमच्यासोबत

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याच नेत्याला संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तशा मागणीला जोर देखील धरला जातोय. याबाबत, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, महायुतीत जर काही झालं तर समजूतदारपणा दाखवायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवारांना पालकमंत्री करावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

दरम्यान 2004 पासून अजित पवार हे पुणे शहरासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी सक्रिय आहेत, त्यांना जिल्ह्यातील राजकीय व प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय त्यांची प्रशासनावर मोठी पकड देखील आहे, त्यामुळे अजित पवारांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी प्रदीप गारटकार यांनी केली आहे. तर, भाजप नेतेही येथील पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येतं. कारण, पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्याचे पालकत्व भाजपकडेच राहिल्यास कार्यकर्त्यांना आनंद व कामे मार्गी लावण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, असे कार्यकर्त्यांना वाटते.

अधिक वाचा  अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड; म्हणाले, संशयाची सुई धनंजय…

विशेष म्हणजे अजित पवार स्वत: येथील पालकमंत्रीपदासाठी आग्रही राहतील, कारण यापूर्वीही त्यांनी आवर्जून येथील पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेऊन घेतले. महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. मात्र, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा त्यांच्याकडे नव्हती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपकडून ते पालकमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात अजित पवारांना यश आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, यावेळीही दावेदार म्हणून अजित पवार यांच्याकडेच पाहिलं जात आहे.