मुंबई: मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत निर्णयाचे सर्वाधिकार भारतीय जनता पक्षाकडे सोपवलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली आहे. वर्षा बंगल्यावर २४ तासांत दोन नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा भेट होत आहे.

एकनाथ शिंदेंनी नव्या सरकारमध्ये काम करावं अशी आमची इच्छा आहे. तशी विनंती मी त्यांना काल केली. ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे, असं फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. आज संध्याकाळपर्यंत शिंदे यांचा निर्णय होईल, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता फडणवीस वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. वर्षावरील अँटी चेंबरमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. सध्या वर्षावर शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव देसाई, शंभुराज देसाई, दादा भुसे हजर आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यात १० वा अदखलपात्र गुन्हा नोंद

गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळणार असेल तरच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारेन, अशी अट शिंदेंनी फडणवीस यांच्यासमोर ठेवल्याचं समजतं. विशेष म्हणजे याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे शिंदेंना गृह मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. गृह विभाग मिळावा म्हणून शिंदेंनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल अशी चिन्हं आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शक्तिशाली खात्यासह दिसतील.

फडणवीस लाडकं खातं सोडणार?

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला भाजपचं सरकार स्थापन झालं. मग त्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री राहिले. हा संपूर्ण काळ त्यांनी गृह खातं आपल्याकडे ठेवलं. शिवसेनेला त्यांनी उपमुख्यमंत्रिपदही दिलं नाही. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदच नव्हतं. शिवाय सेनेच्या मंत्र्यांना अतिशय दुय्यम खाती देण्यात आली.

अधिक वाचा  कंगना यांचं ऐकताच प्रियंका गांधींनी दिलं असं उत्तर; ‘तुम्ही इमर्जन्सी हा चित्रपट पहायला हवा’

२०२२ मध्ये शिंदेंनी बंड केलं. त्यांनी ४० आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरेंची साथ सोडली. भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदे थेट मुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही नसल्याचं फडणवीस आधी म्हणाले होते. पण नंतर दिल्लीहून सूचना आल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिद स्वीकारलं. या सरकारमध्येही फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये असताना गृहमंत्रिपद कायम स्वत:कडे ठेवतात असं भूतकाळ सांगतो.