महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालंय. जनतेनं मोठ्या मताधिक्क्यानं महायुतीला कौल दिला असून निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछाडी झाली आहे. निकालात पुढे आलेल्या आकड्यांतून भाजप 133 जागांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. तर, पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 57 जागा मिळाल्यात. शिवाय, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांसह तिसरं स्थान मिळालंय.

निकालाच्या या आकड्यांवरून महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.

या निकालामुळं राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा..

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रफुल्ल गुडधे-पाटील यांचा पराभव करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 हजार मताधिक्क्याने विजय मिळवला. संघाचे सदस्य, नगरसेवक, महापौर, आमदार, भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा कमी वयात मोठा राजकीय प्रवास आहे.

कशी आहे फडणवीसांची राजकीय कारकीर्द?

वडील गंगाधरराव फडणवीसांकडून त्यांनी लहानपासून राजकारणाचे धडे घेतले. अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेवर जिंकून नगरसेवक झाले. त्यानंतर 27 व्या वर्षी ते महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात फडणवीस हे विधानसभेत निवडून गेले.

अधिक वाचा  पुण्याच्या नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार; मुली कपडे बदलायला गेल्या अन् हादरल्याच; पोक्सोसह कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल

तद्नंतर 2014 साली भाजपची सत्ता येताच फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्या निवडणुकीत महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळाला. शिक्षणाने वकील आणि व्यवस्थापनाची पदवी असलेल्या फडणवीसांनी नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नगरसेवक, सर्वात कमी वयाचा महापौर अशी अनेक पदं त्यांनी भूषवित 1999 साली ते पहिल्यांदा आमदार झाले.

भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशीही ते संबंधित होते. रामजन्मभूमी आंदोलनात फडणवीसांचा सक्रिय सहभाग होता. 1999 साली राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार गेले आणि युतीला विरोधी बाकांवर बसावं लागलं होतं. सलग तीन निवडणुका त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं बहरु लागली. 2014 साली मुख्यमंत्री पदाची माळ अचानकपणे त्यांच्या गळ्यात पडली. मात्र, 2019 साली त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावं लागलं; पण स्वतःवर आलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांनी उत्तमपणे सांभाळली. त्यानंतर एका निर्णायक क्षणी घाव घालून महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि एकनाथ शिंदेंच्या सोबतीने त्यांनी अडीच वर्षे समर्थपणे महायुतीचे सरकार चालवले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले.

अधिक वाचा  समस्त पुणेकरांसाठी अभिमानाचा क्षण पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिल्या खो खो विश्वचषकाची धुरा प्रतिककडेचं

देवेंद्र यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. २०१४ च्या निवडणुकीनंतर वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपद भूषवणारे ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये सरकार स्थापन करुन सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची नोंद झालीये.

फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. फडणवीस यांना त्यांचे वडील गंगाधरराव आणि शोभाताईंचा वारसा लाभला आहे. ते अवघ्या १७ वर्षाचे होते, त्यावेळी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांनी राजकीय वारसा संभाळला.

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ साली फडणवीसांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव केला. १९९९ पासून ते आजपर्यंत विधिमंडळात आमदार, अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य राहिले आहेत.

या शिवाय, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य, ‘ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रिज’चे सचिव, नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन ते होते. १९८९ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष, १९९९ पासून विधानसभा सदस्य, १९९२ ते २००१ दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा महापौर, १९९४ युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, २००१ युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष.

अधिक वाचा  पुणे संवेदना हरवतेय का? ती व्हिव्हळत होती, रस्त्यावर तडफडत होती पण कोणीही… शुभदा कोदारे हत्येचा धक्कादायक फोटो समोर

तसेच २०१० भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस, २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष २०१४ ते २०१९ मुख्यमंत्री, २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अशी पदं त्यांनी भूषवली आहेत आणि आता पुन्हा ते मुख्यमंत्रीपदाचे नेते म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे.

मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांच्या पुढाकाराने शिवसेनेचा एक मोठा गट पक्षातून बाहेर पडून तो सत्तेत सहभागी झाला. त्यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी करुन घेतला. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झालीये. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.