देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्य मंत्री असतील हे आता स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत महायुती नेत्यांच्या बैठकीत याबाबतचे स्पष्ट संकेत दिले मात्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का याची उत्सुकता आहे.

 

पक्ष नेतृत्वाने फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे याची पूर्ण कल्पना दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. माध्यमांमधून शुक्रवारी मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत होती परंतु फडणवीस यांचेच नाव ठरलेले आहे असेही अंतस्थ सूत्रांनी सांगितले. आता मुंबईत तीन नेते जे ठरवतील त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  अंडर 19 आशिया कप 2024; कॅप्टन मोहम्मद अमानची नाबाद शतकी खेळी, जपानसमोर 340 धावांचं आव्हान

 

काय घडले शाह यांच्यासोबतच्या बैठकीत?

 

अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, असे पंतप्रधानांचे व माझेही मत आहे, असे स्पष्ट केले आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट संकेतही दिले. फडणवीस यांचे नाव आताच जाहीर केले तर सध्या जी अनावश्यक चर्चा सुरू आहे तिला पूर्णविराम मिळेल, असे मत मित्रपक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीत व्यक्त केले. त्यावर भाजपमध्ये अशी पद्धत नाही. आधी आमचे दोन निरीक्षक मुंबईला जातील. भाजप आमदारांच्या बैठकीत नेता निवड होईल. अशी बैठक न घेता परस्पर पक्षनेतृत्वाने नाव जाहीर करण्याची पद्धत आमच्याकडे नाही. आणि आम्ही तसे केले तर मग इतर राज्यांत पुढे नेता निवडताना महाराष्ट्राचा दाखला दिला जाईल आणि परस्पर नाव जाहीर करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, असे शाह म्हणाल्याचे कळते.

अधिक वाचा  शपथविधीला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर

 

कोणाला किती मंत्रिपदे, यावर चर्चा नाही

 

एका ज्येष्ठ नेत्याने ‘ माध्यमां’ला सांगितले की, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे द्यायची यावर कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही. आम्ही कोणी तसा प्रस्ताव देखील दिला नाही. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी एकत्रित बसून मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला ठरवावा, असे निश्चित करण्यात आले . त्यानुसार मुंबईत बसून हे नेते निर्णय करतील.

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा आधीच सोडलेला आहे. मात्र, ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. त्यांनी सरकारमध्ये राहावे, अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे, असे शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई म्हणाले. त्यांचा अनुभव, लोकाभिमुख निर्णय घेण्याची क्षमता पाहता, ते मंत्रिमंडळात असणे आवश्यक आहे. आमच्या विनंतीवर ते नक्कीच विचार करतील, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेर परिवार देवेंद्र फडणवीसांच्या आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्याला जाणार का?

आझाद मैदानावर ५ डिसेंबरला शपथ

शपथविधी आता ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. त्या दिवशी चैत्यभूमी परिसरात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे शिवाजी पार्कऐवजी आझाद मैदान निश्चित झाले आहे. क्रीडा विभागाच्या अखत्यारित हे मैदान आहे. ते २ ते ५ डिसेंबरपर्यंत बुक करण्यात आले आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या पर्यायाचीही चाचपणी करण्यात आली, पण तिथे आधीच एक कॉन्सर्ट होणार आहे. समारंभाला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री व विविध राज्यांचे मुख्यमंत्री येतील.f