विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र बहुमत मिळून देखील नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र अजून कोणाचंही नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये गुरुवारी महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

ज्या बातम्या येत आहेत, त्या माध्यमांसमोर मांडल्या जात आहेत. दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असून, त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. बैठक झाली पाहिजे पण बैठकीतून चांगला निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला आहे ते केंद्रीय नेतृत्व आणि शिंदे साहेबांना माहीत आहे.

अधिक वाचा  सर्वात मोठी बातमी! शिंदेंच्या मंत्रिमंडळ सहभागाबद्दल सस्पेन्स अखेर दूर; ही नवी अट दिल्लीकडून मान्य होणार?

उपमुख्यमंत्री व्हायचं की नाही हे शिंदे साहेब ठरवतील. मी उपमुख्यमंत्री होणार यात तथ्य नाही. शिंदे साहेबांनी सरकारमध्ये रहावं अशी आमची इच्छा आहे. शिंदे साहेब अस्वस्थ आहेत पण ते नाराज नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आहे, गृहमंत्रिपदाबाबत कोणताही वाद नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या विजयानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएममध्ये समस्या होती तर महाविकास आघाडीचे आमदारही विजयी झाले असते असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.