मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील भाजपच्या एका माजी आमदाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाजपच्याच कार्यकर्त्याकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजप नेत्याला मारहाण केली जात असल्याचं बघायला मिळत आहे. या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. संबंधित घटना ही उज्जैन जिल्ह्यातील महिदपूर विधानसभा मतदारसंघात घडली. या मतदारसंघात विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गौतम टेटवाल देखील आले होते. याच कार्यक्रमात भाजपचे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी आमदार बहादूर सिंह चौहान यांना भाजपच्याच कार्यकर्त्यांनी गैरवर्तन करत मारहाण केली.

अधिक वाचा  माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना का दिली भांडी घासण्याची शिक्षा? चौकीदारीही करणार, काय आहेत आरोप?

महिदपूर विधानसभा मतदारसंघातील नारायणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणानंतर प्रभारी मंत्री गौतम टेटवाल, खासदार अनिल फिरोजिया, भाजप जिव्हाध्यक्ष बहादूर सिंह बोरमुंडला हे महिदपूरच्या दिशेला जात होते, या दरम्यान एक दूध प्लांटच्या बाहेर भाजप नेता प्रताप सिंह आर्य यांनी प्रभारी मंत्री आणि खासदारांसाठी स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचं माजी आमदार बहादूर सिंह चौहान यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. तरीही ते मंचावर पोहोचले आणि कार्यक्रमात सहभागी झाले.

नेमकं काय घडलं?
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर बहादूर सिंह चौहान हे मंचावरुन उतरताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. यावेळी बहादूर सिंह चौहान आणि प्रताप सिंह आर्य यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. विशेष म्हणजे प्रभारी मंत्री गौतम टेटवाल यांना कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी स्वत:ला मंचावरुन खाली यावं लागलं. यावेळी खासदार अनिल फिरोजिया यांनी माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. पण कार्यकर्ते ऐकून घेण्याचा मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर कार्यकर्ते शांत राहिले. या प्रकरणी महिदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  शिवसेना खासदारही हवालदिल थेट एकनाथ शिंदेंना फोन महत्त्वाची खाती दुसऱ्याकडे देऊ नका, सत्तेतही सामील व्हा

दरम्यान, माजी आमदार बहादूर सिंह चौहान आणि पंचायत सदस्य प्रतापसिंह आर्य एक-दुसऱ्याचे कट्टर विरोधक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतही त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी देखील झालेल्या वादाला तसंच कारण आहे. प्रताप सिंह आर्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बहादूर सिंह चौहान यांनी सहभागी होत मंचावर उपस्थित झाल्याने हा वाद झाला. ते मंचावर जात असतानाच प्रताप सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी बहादूर सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांनीच नंतर बहादूर सिंह मंचावरुन खाली उतरल्यावर त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.