मुंबई दि. २८ (रामदास धो. गमरे) “जात-धर्म-पंथ-भाषा, लिंग, प्रांत गरीब-श्रीमंत असा कोणताच भेदभाव न करता सर्वच नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक देशाच्या छत्रछायेखाली समान पातळीवर ठेवण्यासाठी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान हा एक राष्ट्रीय ग्रंथ निर्माण केला, या भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्षे बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिवडी गटक्रमांक १३ संलग्न सर्व शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गटप्रतिनिधी मा. राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली व बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना अध्यक्षांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर संतोष जाधव यांनी ज्योत प्रज्वलन केले तर आदर्श बौद्धाचार्य प्रविण तांबे गुरुजी यांनी आपल्या सुमधुर वाणीने धार्मिक विधी संपन्न केला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय चिटणीस संदीप मोहिते यांनी अत्यंत लाघवी शैलीत करून सर्वांची मने जिंकली, सदर प्रसंगी उपस्थितांच्या शुभहस्ते संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पसुमने अर्पण करण्यात आले. तद्नंतर प्रमुख अतिथी लक्ष्मण भगत यांनी सर्व उपस्थितांच्या समवेत संविधान प्रस्तावणेचे सामूहिक वाचन केले.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना म्हणाले की “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जाण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले त्याकाळी बाबासाहेब आणि काँग्रेस यांच्यामधील वाद सर्वश्रुत होते, भारताचे संविधान कोणी लिहावे हा यक्षप्रश्नच होता, त्यातूनच सन १९४६ रोजी संविधान समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हा काँग्रेस व काँग्रेसचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी संविधान समितीमध्ये डॉ. बी.आर.आंबेडकरांनी येताच कामा नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करून आम्ही संविधान सभेत आंबेडकरच काय पण त्यांना स्पर्श करून आलेली हवा देखील आत घुसू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली; परंतु तळागाळातील दलित, वंचित, मागासवर्गीय घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांना संविधान सभेत जाणे गरजेचे होते कारण त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही शेटजी, भटजी, सवर्ण, उच्चवर्णीय यांना दलित, वंचितांचे देणेघेणे नव्हते, संविधान समितीमध्ये सामील होण्यासाठी तीन निकष होते पहिला प्रांतिक निवडणुकीतून निवडून आलेले प्रतिनिधी किंवा दुसरा संस्थांनिक प्रतिनिधी व तिसरा अँग्लो इंडियन प्रतिनिधी, त्यातील प्रांतिक निवडणूक या निकषांवर पुढे जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या त्यांचा स्वतंत्र मजदूर पक्ष एका रात्रीत बरखास्त करून शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली आणि सन १९४५ साली निवडणुकीत उतरले परंतु त्यात त्यांना अपयश आले, त्यांचे सर्व उमेदवार पडले परंतु जोगेंद्र नाथ मंडल हे निवडून आले होते परंतु त्यांनी म्हटले की “वंचित, शोषितांच्या ज्ञानहक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांसारखे ज्ञानसूर्य संविधान सभेत पाहिजेत” व त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बाबासाहेबांना निवडून दिले त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेत जाऊ शकले, परंतु फाळणीनंतर काँग्रेसने जाणूनबुजून पश्चिम बंगाल पाकिस्तानला जोडला व त्यामुळे पश्चिम बंगाल भारताचा भाग नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान समितीमधील पद रद्द झाले इतके घाणेरडे राजकारण त्यावेळी काँग्रेसने केले.
स्वातंत्र्य भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सदर समितीमध्ये ३०० लोक सामील करून घेतले होते परंतु त्यातील एकही मसुदा तयार करण्याच्या लायक अथवा सक्षम नव्हता हे लक्षात आल्यावर नेहरूंनी संविधान समितीचे सल्लागार बी. एन. राव यांना आयव्हर जेनिंग्ज जवळ राज्यघटना लिहून घेण्यासाठी पाठवले, त्याकाळी स्वातंत्र्य मिळालेल्या सर्वच देशांचे संविधान सर आयव्हर जेनिंग्ज (Sir Ivor Jennings) हे कंत्राटी पध्दतीने लिहून देत व त्यांनी जवळपास १८० देशांचे संविधान लिहिले होते, ज्यावेळी बी. एन. राव त्यांच्याकडे गेले तेव्हा आयव्हर जेनिंग्ज म्हणाले की “तुमच्या देशात स्वतः डॉ. बी. आर. आंबेडकर असताना तुम्हाला आमची गरजच काय ?” त्यावेळी बी. एन. राव हे तत्कालीन ICS (Indian Civil Service) म्हणजेच आताचे IAS (Indian Administrative Service) अधिकारी होते व आपण जर नेहरू व गांधीना सांगितलं की डॉ. बी. आर. आंबेडकरांना संविधान समितीवर घ्या तर ते कदाचित आपल्याला नोकरीवरून बडतर्फ करतील किंवा कुठे दूरवर आपली बदली करतील म्हणून बी. एन. राव गप्प राहिले, पुढे संविधान समितीत कोणाला घ्यावे याकरता नेहरूंच्या बहीण व तत्कालीन राजदूत विजया लक्ष्मी पंडित या सर आयव्हर जेनिंग्ज यांच्याकडे गेल्या व त्यांनी सर आयव्हर जेनिंग्ज यांना पैश्यांचेही प्रलोभन दिले त्यावेळी ही सर आयव्हर जेनिंग्ज यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की तुमच्या देशात तीन बॅरिस्टर आहेत ते जर नाही म्हटले तर मी सांगेन ती रक्कम अदा केल्यास मी तुमचे संविधान लिहून देईल, सर आयव्हर जेनिंग्ज नी सांगितलेली तीन नावे म्हणजे बॅरिस्टर तेजबहाद्दूर सप्रू, बॅरिस्टर माधव राव व बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर. राज्यपाल विजया लक्ष्मी पंडित यांनी नेहरूंना सर्व परिस्थिती समजावून सांगितली, म्हणून नेहरू प्रथम उच्चकुलीन ब्राम्हण तेजबहाद्दूर सप्रू यांच्याकडे गेले परंतु भौगोलिक विविधता व असंख्य जाती, धर्माने नटलेल्या भारत देशाचे सोडा पण आपण जेथून आहोत त्या उत्तर प्रदेश या राज्याचे ही संविधान आपण लिहू शकत नाही हे लक्षात आल्याने आजारपणाची कारणे देऊन त्यांनी नकार दिला, त्यानंतर नेहरू मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माधव राव जयकर यांच्याकडे गेले, गिरगाव झावबा वाडीत राहणारे बॅरिस्टर माधव राव यांनी विचार केला की सध्या पुणे विद्यापीठाचे काम सुरू आहे त्या पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू बनण्याची सुवर्णसंधी ही आपल्याकडे असताना ३०० लोकांच्या संविधान समितीत जाऊन आपला काय फायदा होणार म्हणून त्यांनी ही नकार दिला, म्हणून शेवटी नेहरूंकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरां व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही.
बाबासाहेबांसोबत पक्षीय वाद असला तरी नेहरू नेहमीच बाबासाहेबांच्या विद्वातेचे चाहते होते; नेहरूं गांधीजींकडे गेले आणि बाबासाहेबांना घटना समितीवर घ्या असे सांगितले त्यावर हा तर दुग्धशर्करा योग आहे असे म्हणत गांधींनी ही बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत सामावून घेण्यास होकार दिला, त्यावेळचे महाराष्ट्र स्टेटचे तत्कालीन पंतप्रधान (आजचे मुख्यमंत्री) बाळ गंगाधर खेर यांनी कायदेशीररित्या बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीमध्ये सहभागी करून घेतले, त्यानंतर घटना समितीमध्ये मसुदा कमिटी निर्माण करण्यात आली त्यात एकूण ७ सभासद होते त्यात भारताचे भाग्य सुवर्णाक्षरांनी कोरणारे भाग्यविधाते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. सदर मसुदा कमिटीमधील इतर ६ जणांनी मसुदा तयार करण्यास कधीही बाबासाहेबांना साथ दिली नाही, शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस करून एकट्याने कोणाचीही मदत न घेता, कायदेमंत्री म्हणून काम सांभाळत भारताचे संविधान एकहाती लिहून काढले.
डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते एकेरात्री ते कामकाज पाहण्यासाठी गेले असता मसुदा समितीच्या सहाही टेबलावरील दिवे बंद होते केवळ सातव्या टेबलावर रात्रीच्या गुडूप अंधारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा ज्ञानसागर दिव्याच्या प्रकाशात प्रजासत्ताक भारत देशाच्या येणाऱ्या भविष्याकरता संविधान लिहीत होता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे केवळ १४० दिवसात संविधान लिहून काढले आहे, परंतु त्यासंदर्भात फेरविचार, वाद, सूचना, चर्चा याकरता २ वर्षे, ११ महिने, १७ दिवस इतका काळ लोटला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीने संविधान लिहून पूर्ण केले होते त्यांच्या या कामामुळे डॉ. राजेंद्र प्रसाद ही भारावून गेले होते म्हणूनच बाबासाहेबांनी सदर घटना सुपूर्द केल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की प्रजासत्ताक भारत देशाच्या घटनेचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर ते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत, त्यांनी एकट्याने एकहाती भारतीय संविधान लिहिले आहे. अश्याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तसेच घटना दुरुस्तीबाबत व संविधान सरनाम्यातील ‘समाजवादी’, धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ हे शब्द बदलण्यासाठी ज्या याचिका ४४ वर्षांहून अधिक कालावधीपूर्वी टाकल्या होत्या त्या सर्व याचिका फेटाळून संविधान हे जिवंत दस्तऐवज आहे व त्याला आवाहन देण्याचे किंवा दुरुस्ती करण्याचे कोणतेही कारण नाही असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी प्रतिपादन केले, त्यानिमित्त लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात त्यांचे ही आभार मानले व संविधान दिनी आपण आपले संविधान चिरायू ठेवू” असे संबोधित केले.
सदर प्रसंगी ऍड. ममता शेखर भगत, सार्वभौम राष्ट्र दैनिकाचे सहसंपादक गुणाजी काजर्डीकर, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव आदी मंडळींनीही शुभेच्छापर भाषणात आपले अमूल्य विचार व्यक्त करून सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या, सदर प्रसंगी शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी संपूर्ण कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथी लक्ष्मण भगत यांच्या सन्मान केला. सदर कार्यक्रमास विजय जाधव, विभागीय कार्याध्यक्ष संतोष जाधव, विभागीय उपाध्यक्ष राजू धोत्रे, विभागीय सरचिटणीस संदीप मोहिते, विभागीय कोषाध्यक्ष प्रविण तांबे, श्रीधर मोरे, अनंत मोहिते, प्रसाद तांबे, सिताराम कांबळे, जगन्नाथ जाधव, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, शाखा क्र. ५७८ चे रमाई महिला मंडळ, सहा नंबर गेट शाखा क्र. २१६ चे महिला मंडळ, सर्वच शाखांचे पदाधिकारी आदी अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा. राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी “अदानी-अंबानी असो, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, व्यावसायिक, नोकरदार, उच्चशिक्षित, अशिक्षित असो किंवा तळागाळातील गरीब व्यक्ती परंतु संविधानाने सर्वच स्तरातील सर्वच लोकांना एक मताचा अधिकार देऊन सर्वांना समान पातळीवर आणले आहे व सर्वांना एकसंघ करून देशात समानता आणली आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन गेली ७५ वर्षे सर्वाना समान हक्क प्रदान करून देशातील प्रत्येक नागरिकावर उपकार केले आहेत म्हणून या संविधानाचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे, बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड जरी अशक्य असली तरी संविधान जोपासून त्याचे रक्षण करून प्रत्येकाने बाबासाहेबांसाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे विचार मांडून सर्व उपस्थितांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे विभागीय चिटणीस संदीप मोहिते यांनी आभार मानले व २६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या सर्व नागरिक व पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.