इंडियन प्रिमिअर लीगमधील पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटाने नव्याने संघात समावेश केलेल्या श्रेयस अय्यरची माफी मागितली आहे. खरं तर श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असता. मात्र तसं झालं नाही. यानंतर जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटाने श्रेयस अय्यरची माफी मागितली आहे. तिने केलेल्या एका चुकीच्या उल्लेखासाठी तिने माफी मागितली.
श्रेयसचा विक्रम काही काळच टिकला
श्रेयस अय्यरची बेस प्राइज 2 कोटी रुपये इतकी होती. त्याच्यावर सुरुवातीला अनेक संघांनी बोली लावली. 2024 चं जेतेपद कोलकाता नाईट रायडर्सला जिंकून देणाऱ्या या कर्णधारासाठी सर्वच संघांमध्ये चूरस दिसून आली. बोली लावता लावता श्रेयसने मिचेल स्टार्कचा 22 कोटींचा विक्रम मागे टाकत तब्बल 26 कोटी 75 लाखांची बोली मिळवली. एवढ्या रक्कमेला पंजाबच्या संघाने श्रेयसला विकत गेतलं. मात्र श्रेयसचा हा विक्रम काही मिनिटं टिकला. कारण त्यानंतर काही वेळात लिलाव झालेल्या ऋषभ पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाच्या तब्बल 27 कोटी रुपये मिळवले. त्यामुळे श्रेयस अय्यर हा सर्वाधिक रक्कम मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.
…अन् प्रिती श्रेयसला म्हणाली सॉरी
खेळाडूंना एवढ्या मोठ्या रक्केमेच्या ऑफर मिळत असल्याबद्दल प्रितीला विचारण्यात आलं. त्यावर प्रितीने आश्चर्यचकित होऊन प्रतिक्रिया नोंदवताना एवढी मोठी बोली लावली जाईल असं अपेक्षित नसल्याचं सूचित केलं. “नेहमीच हे वाटत होतं की यंदाची बोली ही विक्रमी असेल. मात्र 26 कोटी रुपये… सॉरी… 27 कोटी रुपये… सॉरी श्रेयस! काही भाग तर टॅक्समध्ये कापला जाईल,” असं प्रिती म्हणाली. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
या खेळाडूंसाठीही प्रितीच्या संघाने मोजले कोट्यवधी रुपये
पंजाबने केवळ श्रेयस अय्यरच नाही तर अर्शदीप सिंगसाठी आणि युजवेंद्र चहलसाठीही भरपूर पैसे मोजले. अर्शदीपसाठी 18 कोटी आणि युजवेंद्रसाठीही त्यांनी 18 कोटी रुपये मोजले. त्याचप्रमाणे मार्कस स्टॉनिससाठी 11 कोटी, मार्को जॅनसनसाठी 7 कोटी, ग्लेन मॅक्सवेल आणि निहाल वाड्रासाठी प्रत्येक 4.20 कोटी रुपये पंजाबच्या संघाने मोजले. लिलावामध्ये सहभागी झालेल्या संघांपैकी पंजाबकडे सर्वाधिक पैसे शिल्लक होते. 110 कोटी 50 लाख रुपये पंजाबकडे होते. त्यामुळेच पहिल्यांदाच पदक जिंकायचं असा विचार करुन पंजाबने भरपूर पैसे खरेदी करुन चांगले खेळाडू निवडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला जे खेळाडू संघात हवे होते त्यापैकी 90 टक्के खेळाडूंना विकत घेण्यात आम्हाला यश आल्याचं लिलाव संपल्यानंतर प्रितीने सांगितलं.