राज्यभरात दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात पुणे शहरातून होणार आहे. पुणे शहरात दुचाकीस्वारच नाही तर सहप्रवाशांवरही आता हेल्मेट लागणार आहे. विनाहेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला असल्याने चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे

आदेशाची अंमलबजावणी कधीपासून?
राज्यात यापूर्वी अनेक वेळा हेल्मट सक्ती करण्याचा निर्णय झाला. परंतु त्या निर्णयास जनतेकडून विरोध झाला. आता दुचाकीस्वारांचे वाढत्या अपघातांमुळे पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत आहे. परंतु आता रस्त्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.

अधिक वाचा  प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान! महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादीही वाचा

का काढले हेल्मेट सक्तीचे आदेश
राज्यात दुचाकीस्वाराचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहे.