अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिच्या कुटुंबासाठी नोव्हेंबर महिना खूप खास असतो. या महिन्याच्या पहिल्याच तारखेला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस साजरा केला जातो. यावर्षी आराध्या 13 वर्षांची झाली आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस असतो. या सर्वच दिवसांचं निमित्त साधत ऐश्वर्याने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. मुलगी आराध्याचा वाढदिवस आणि वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा करतानाचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये मात्र ऐश्वर्या पती आणि आराध्याचे वडील अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही. यावरून नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा  सर्वात मोठी बातमी! शिंदेंच्या मंत्रिमंडळ सहभागाबद्दल सस्पेन्स अखेर दूर; ही नवी अट दिल्लीकडून मान्य होणार?

यातील एका फोटोमध्ये आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोसमोर डोकं ठेवल्याचं पहायला मिळतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्यासुद्धा तिच्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून उभी राहते. तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या कृष्णराज राय यांच्या फोटोसमोर उभ्या असल्याचं पहायला मिळतंय. एका फोटोत ऐश्वर्याची आईसुद्धा दिसतेय. तर पुढील काही फोटो आराध्याच्या लहानपणीचे आहेत. यातील शेवटचा फोटो आराध्याच्या बर्थडे पार्टीचा आहे. आराध्या आता अधिकृतरित्या किशोरवयीन झाली आहे.

‘माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय बाबा-अज्जा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय.. माझा आत्मा.. सदैव आणि त्याही पलीकडे..’, असं कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोंना दिलं आहे. ऐश्वर्याच्या या फोटोंवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण त्याचसोबत अभिषेक बच्चन या सेलिब्रेशनमध्ये का सहभागी नाही, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. पण या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी मात्र दिसून येत असल्याचं काही चाहत्यांनी निदर्शनास आणलं.

अधिक वाचा  राज्यसभेत सापडलं नोटांचं बंडल, उडाला एकच गोंधळ, काँग्रेसशी काय कनेक्शन?

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्याच्या वाढदिवशीही अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिण्यात आली नव्हती. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात जेव्हा दोघं वेगवेगळे आले, तेव्हा घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. या लग्नात अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आला होता, तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीच नंतर आल्या होत्या.