महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप बोहोल्यावर चढला असून नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पृथ्वीकचा विवाहसोहळा पार पडला. पृथ्वीकनं त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळसोबत आपली लग्नगाठ बांधली. पृथ्वीकनं स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डलवरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पृथ्वीकच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसोबतच त्याच्या सहकाऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच, पृथ्वीक आणि प्राजक्ताला नव आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अनेकांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत पृथ्वीकनं एक पोस्ट लिहिली आहे. पृथ्वीकनं लिहिलं आहे की, “25-10-2024… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” पृथ्वीकनं अत्यंत साधेपणानं आपला लग्नसोहळा उरकला. त्याच्या बायकोचं नाव प्राजक्ता असं आहे. बऱ्याच काळापासून पृथ्वीक आणि प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होते. अखेर दोघांनी आपलं नातं कन्फर्म करत एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे.
पृथ्वीक आणि त्याची नववधू दोघेही फार सुंदर दिसत होते. दोघांनीही लग्नसोहळ्यासाठी अत्यंत खास लूक केला होता. प्राजक्तानं क्रिम कलरची सुंदर साडी नेसली होती. तर पृथ्वीकनं पांढऱ्या रंगाचं धोतर आणि सदरा घातला होता. प्राजक्ता अत्यंत मिनिमम मेकअप लूकमध्ये दिसून आली. दोघांच्या गळ्यात मोगऱ्याचा हार होता आणि चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, पृथ्वीकनं लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर, त्याच्या सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी पृथ्वीकला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक आपल्या हटके परफॉरमन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीत तो नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्याव्यतिरिक्त पृथ्वीक काही नाटकं केली आहे. रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणून पृथ्वीकनं आपली ओळख निर्माण केली आहे. अशातच आता त्यानं आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.