हडपसर (प्रतिनिधी): हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आमदार चेतन तुपे यांना पुन्हा मैदानात उतरवले असताना महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; तर मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होताच माजी आमदार महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले तर हडपसर या मतदारसंघात दोन शहराध्यक्ष आणि आजी माजी आमदार अशी चौरंगी लढत होणार आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती; तर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे. महायुतीने हडपसरमधून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे शिवसेनेच्या शिंदेगटाचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांचा पत्ता कट झाला आहे. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,योगेश ससाणे,बंडू गायकवाड, प्रवीण तुपे, समीर तुपे असे अनेक इच्छुक निवडणूक लढविण्याच्या तयारी मध्ये आहेत. इच्छुकांची यादी मोठी असल्याने आघाडीत बिघाडी झाल्यास नेमका फायदा कोणाला? अशातच, माजी नगरसेवक आनंद अलकुंटे यांनी शक्तीप्रदर्शन करत आव्हान दिले आहे. वंचित आणि जरांगे फॅक्टरसह तिसरी आघाडी राजकीय गणिते बिघडू शकते. महायुतीचे उमेदवार चेतन तुपे, महाविकास आघाडी प्रशांत जगताप,मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत की महाविकास आघाडी बंडखोर उमेदवार महादेव बाबर अशी चौरंगी लढत ?
हडपसर मतदारसंघातील पंरपरा कायम ?
हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यात निवडणुका झाल्या. कमीत कमी २ हजार ते १० हजारांच्या फरकाने येथे उमेदवार निवडून येत आहेत. त्यामुळे अटीतटीच्या लढतीची पंरपरा कायम आहे.
या मतदारसंघात सातत्याने बदल
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये २००९ मध्ये हडपसर मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर, २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल झाल्याचे दिसते.