मुंबई : मागील तीन दिवसांपासून 20 हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. यात आता विस्तारा कंपनीचीही भर पडली आहे. फ्रँकफर्टहून मुंबईत येणाऱ्या विस्तार कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली.यानंतर हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र सतत येणाऱ्या बॉम्बच्या अफवांनंतर सायबर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या असून त्यांनी इंटरनेट मीडिया हँडल निलंबित किंवा ब्लॉक केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रँकफर्टहून मुंबईत येणाऱ्या विस्तार कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. यानंतर हे विमान गुरुवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 7.45 वाजता विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. यानंतर हे विमान मुंबई विमानतळाच्या निर्मनुष्य परिसरात नेऊन प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले. विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र यापूर्वीही स्पाइस जेटमध्येही बॉम्ब ठेवल्याची पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी स्पाइस जेट कंपनीच्या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. दरभंगा ते मुंबई आणि लेह ते दिल्ली या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून ही दोन्ही विमाने लवकर रिकामी करा. अन्यथा सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडतील, अशा आशयाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही विमानांतील प्रवाशांना खाली उतरवून तपासणी केली. मात्र विमानांमध्ये कोणतीही बॉम्बसदृश वस्तू किंवा स्फोटक आढळून आली नाही.
सोशल मीडियावर करण्यात आलेली ती पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे उघड झाले. यानंतर स्पाइस जेट कंपनीचे ड्युटी मॅनेजर धनंजय गावडे (54) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. धनंजय गावडे यांच्या तक्रारीनुसार कंपनीच्या सोशल मीडियावर हँडलवर 16 ऑक्टोबर रोजी साइकवर्ड या नावाने एक ट्वीट करण्यात आले होते. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सतत येणाऱ्या बॉम्बच्या अफवांमुळे सायबर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यांनी भारतीय विमानांमध्ये बॉम्बची धमकी देणारी जवळपास 10 इंटरनेट मीडिया हँडल निलंबित किंवा ब्लॉक केली आहेत. सायबर, विमान वाहतूक सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या संयुक्त पथकाने केलेल्या विश्लेषणानंतर ही सर्व हँडल निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. यापैकी बहुतेक खाती ट्विटरवर होती. एजन्सींनी बॉम्बच्या फसवणुकीशी संबंधित प्रत्येक प्रकरणात पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याबरोबरच इंटरनेट मीडिया आणि डार्क वेबवर सायबर पाळत ठेवणे वाढवली आहे.