पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने दमदार फलंदाजीचा नजराणा सादर केला. भारतीय संघाला अर्धशतकही गाठते आले नाही.पण न्यूझीलंडने मात्र तिसऱ्या दिवसाच्या उपहारापर्यंत त्रिशतकी मजल मारली. रचिन रविंद्रचे झंजावाती शतक आणि डेवॉन कॉनवेच्या ९१ धावांच्या जोरावर त्यांनी मोठी आघाडी घेतली. भारताकडे दिग्गज फलंदाज असूनही टीम इंडियाला मात्र मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही. रनमशिन असलेला विराट कोहली शून्यावर बाद झाला. असे असूनही दिनेश कार्तिकने मात्र त्याची तोंडभरून स्तुती केली.
“रोहित शर्मा बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आला. खरं तर तो या स्थानावर खेळायला नकार देऊ शकला असता. ‘मी चौथ्या नंबरवरच खेळणार’ असं तो म्हणाला असता तर त्याला कुणीही अडवलं नसतं. उलट केएल राहुल किंवा सर्फराज खानला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवता येऊ शकले असते. कोचदेखील या निर्णयाच्या आडवे आले नसते. पण विराट काहीही न बोलता तिसऱ्या क्रमांकावर खेळायला उतरला. यावरुनच त्याची मानसिकता दिसून येते की तो आलेल्या आव्हानाला बिनधास्त सामोरा जातो,” अशा शब्दांत दिनेश कार्तिकने त्याची स्तुती केली.
“मैदानात उतरल्यानंतर काय घडेल ही बाब वेगळी असते. पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय हा भारतीय फलंदाजांच्या बाजूने फायद्याचा ठरला नाही ही अडचण झाली. पण यात एक चांगली गोष्ट दिसून आली की खेळाडू संघाच्या गरजेनुसार जबाबदारी घ्यायला आणि तडजोड करायला तयार आहेत. यासोबतच अजून एक गोष्ट दिसून येते की कोच ज्या प्रकारचा विचार करतो यासाठी खेळाडू होकार देतात. हा एकप्रकारे कोचचा आदर करण्याचा प्रकारच आहे,” असेही दिनेश कार्तिक म्हणाला.